वर्षाला चार तपासण्या, फिटनेस प्रमाणपत्र, तरीही ‘एसटी’ आगीच्या विळख्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 12:38 PM2022-08-23T12:38:08+5:302022-08-23T12:38:41+5:30
दुर्घटना सुरूच : चौकशी समिती नियुक्त; बसगाड्यांच्या देखभाल-दुरुस्तीकडे लक्ष देण्याची सूचना
औरंगाबाद : गेली ७४ वर्षे सेवा देत ‘एस.टी. बसचा प्रवास हा सुरक्षित प्रवास’ अशी ओळख ‘एस.टी.’ने निर्माण केली आहे. अपघात टाळण्यासाठी प्रत्येक एस.टी.चे वर्षातून एकदा फिटनेस प्रमाणपत्र घेतले जाते. शिवाय वर्षातून तीन वेळा सर्व तपासण्या आणि दररोज एकदा तपासणी केली जाते. मात्र त्यानंतरही ‘एसटी’ला आग लागण्याच्या घटना घडतच आहेत. त्यामुळे या सगळ्या तपासण्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
नाशिकच्या आगार क्र. १ मधून रविवारी रात्री नाशिक-हिंगोली ही बस रवाना झाली होती. रात्री १ वाजेच्या सुमारास गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव येथे बस असताना अचानक इंजीनमधून धूर निघू लागला. चालक आर. डी. लोखंडे यांच्या हे लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ बस थांबवली. वाहक एम. पी. नरोळे यांनी २६ प्रवाशांना खाली उतरवले. याच वेळी संपूर्ण बस आगीने वेढली गेली. विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर, मध्यवर्ती बस स्थानकाचे आगार व्यवस्थापक संतोष घाणे, उपयंत्रअभियंता वावळे यांनी घटनास्थळी पाहणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे.
कारण शोधले जाईल
नाशिक - हिंगोली एसटीला नेमकी कोणत्या कारणामुळे आग लागली, याचा शोध घेतला जाईल. यांत्रिकी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाईल. अधिक बारकाईने बसगाड्यांच्या देखभालीकडे लक्ष देण्याची सूचना आगार व्यवस्थापकांना करण्यात येईल, असे विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी सांगितले.
यापूर्वी २४ एप्रिलची घटना
सिल्लोड - जळगाव महामार्गावरील जगप्रसिद्ध अजिंठा घाट चढत असताना एसटी महामंडळाच्या मुक्ताईनगर - औरंगाबाद बसने अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखत चालकाने बसमध्ये प्रवास करीत असलेल्या जवळपास ४० प्रवाशांना बसच्या खाली उतरल्याने सुदैवाने जीवित हानी टळली.