अतिक्रमण हटाव पथकातील चार कंत्राटी इमारत निरीक्षक थेट ‘घरी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 04:50 PM2018-10-08T16:50:29+5:302018-10-08T16:51:39+5:30
महापालिकेत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विरोधात तक्रारींचा सूरही वाढत चालला आहे.
औरंगाबाद : महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकातील चार कंत्राटी इमारत निरीक्षकांना थेट कामावरून कमी करण्याचा निर्णय मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी घेतला. मागील महिन्यात कंत्राटी इमारत निरीक्षकांसह विभागप्रमुखाला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्यानंतर मनपा आयुक्तांनी ही कारवाई केली. महापालिकेत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विरोधात तक्रारींचा सूरही वाढत चालला आहे.
महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागात रिक्त पदे भरण्यासाठी आऊटसोर्सिंग पद्धतीवर कर्मचारी घेण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांवर कोणतीही जबाबदारी नव्हती. मात्र, प्रशासन त्यांच्याकडून आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांप्रमाणे काम करून घेत होते. हे कर्मचारी फाईल, लिहिणे, वरिष्ठांची मंजुरी घेणे आदी कामे करीत होते. या कर्मचाऱ्यांनी आर्थिक घोटाळा केल्यास जबाबदार कोणाला धरणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करणारे कंत्राटी कर्मचारीही अत्यंत बिनधास्तपणे काम करीत आहेत. दिवसभर ‘टार्गेट’समोर ठेवून ही मंडळी काम करीत आहे.
मागील महिन्यात अतिक्रमण हटाव विभागातील एक कंत्राटी इमारत निरीक्षक आणि विभागप्रमुखाला ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर कंत्राटी इमारत निरीक्षक नकोच, असे प्रशासनाचे मत बनले. शुभम नागे, मो. सुफियान मुकीम, कुलदीप पवार, सुबोध तायडे, या चार इमारत निरीक्षकांना थेट कामावरून कमी करण्याचे आदेश आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी काढले. याच विभागातील आणखी दोन इमारत निरीक्षकांना अभय का देण्यात आले, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. नगररचना विभागातील चार कंत्राटी कर्मचाऱ्यांवरही प्रशासन कोणाच्या सांगण्यावरून मेहरनजर दाखवत आहे.
४० माजी सैनिकांना सुरक्षारक्षकाचे काम
महापालिकेने सर्व नियम धाब्यावर बसवून ९० माजी सैनिकांची निवड केली. नागरिक मित्र पथकासाठी म्हणून मनपाने त्यांची निवड केली. यातील ४० माजी सैनिकांना सुरक्षारक्षक म्हणून काम देण्यात आले आहे. कंत्राटी पद्धतीवरील जुने ४० सुरक्षारक्षक कामावरून कमी करण्यात आले आहेत. ४० माजी सैनिकांची घनकचरा विभागात नियुक्ती करण्यात आली.