चार ठेकेदारांची बिले थांबविली

By Admin | Published: June 19, 2014 12:35 AM2014-06-19T00:35:47+5:302014-06-19T00:51:36+5:30

औरंगाबाद : प्राधिकरणांतर्गत पैठण शहरात सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची १२ कोटी रुपयांची कामे करण्यात आली

Four contractor bills stopped | चार ठेकेदारांची बिले थांबविली

चार ठेकेदारांची बिले थांबविली

googlenewsNext

औरंगाबाद : प्राधिकरणांतर्गत पैठण शहरात सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची १२ कोटी रुपयांची कामे करण्यात आली. मात्र, यातील बरेच काम योग्य पद्धतीने झाले नसल्याचे त्रयस्थ संस्थेच्या तपासणीत आढळून आले आहे. त्यामुळे चार ठेकेदारांची बिले थांबविली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष विक्रमकुमार यांनी दिली.
पैठण शहराचा विकास करण्यासाठी राज्य सरकारने २०११ मध्ये पैठण- आपेगाव प्राधिकरण स्थापन केले. या प्राधिकरणात पैठणसह पाच गावांचा समावेश आहे. प्राधिकरणांतर्गत विविध विकास कामे करण्यासाठी २०९ कोटी ९२ लाख रुपयांच्या आराखड्यास २०१३ साली मंजुरी देण्यात आली. त्यानंतर पहिल्या टप्प्यात २३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यातून पैठण शहरात वर्षभरापासून विविध कामे केली जात आहेत. त्यात सिमेंट काँक्रीटच्या चार रस्त्यांचाही समावेश आहे. सुमारे १२ कोटी रुपये खर्चाच्या या रस्त्यांसंदर्भात प्रशासनाला वेळोवेळी तक्रारी प्राप्त झाल्या. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पथकाकडून तपासणी करून घेतली. त्यात चार रस्त्यांची कामे योग्य पद्धतीने झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्रयस्थ संस्थेने तपासणीअंती अनेक त्रुटी दाखवून दिल्या आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने संबंधित ठेकेदारांना काही ठिकाणी तयार केलेला रस्ता उखडून पुन्हा तयार करून देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांची बिलेही थांबविण्यात आली आहेत. ठेकेदारांनी हे काम नव्याने करून द्यायचे आहे. त्यानंतर तपासणी करून योग्य आढळल्यासच त्यांची बिले काढली जातील, असे विक्रमकुमार म्हणाले.
आणखी ४० कोटी निधी मिळाला
पैठण आपेगाव प्राधिकरणासाठी सरकारने आणखी ४० कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यातून कोणती कामे करायचीत याचे नियोजन आधीच झालेले आहे. आचारसंहिता संपताच या कामांना सुरुवात केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Four contractor bills stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.