चार कोटींच्या विटांचा झाला चिखल; अवकाळी पावसाच्या तडाख्याने वीटभट्टी उद्योग कोलमडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 07:29 PM2021-05-19T19:29:14+5:302021-05-19T19:35:55+5:30
विटांना बांधकामासाठी मोठी मागणी असल्याने शेकडो वर्षापासून पैठण परिसरास वीटांचा उद्योग सुरू आहे.
पैठण : बुधवारी सायंकाळी झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे पैठण परिसरातील जवळपास ८० लाख कच्च्या विटांचा चिखल झाला आहे. लॉकडाऊन सारख्या प्रतिकूल परिस्थितीत सुरू असलेल्या विट निर्मिती उद्योगाला अवकाळी पावसाने जबर तडाखा दिला असून विट उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अवकाळी पावसाने ऐवढ्या मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची ही पहिलीच वेळ असून या अगोदर अवकाळीचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर फटका बसला नसल्याचे बोलले जात आहे.
गोदाकाठच्या उत्कृष्ट मातीमुळे निर्माण होणारी पैठणची वीट लोकप्रिय आहे. या विटांना बांधकामासाठी मोठी मागणी असल्याने शेकडो वर्षापासून पैठण परिसरास वीटांचा उद्योग सुरू आहे. अलिकडच्या दहा वर्षात अनेक सुशिक्षित बेरोजगार या व्यवसायात उतरल्याने स्पर्धेतून दर्जेदार विटांची निर्मिती पैठण परिसरात होत आहे. पैठण शहरातील गोदाकाठ परिसरासह सिध्देश्वर मंदीर, पाटेगाव, शहागड रोड परिसरात पाच ते सात किलोमीटर पर्यंत विटभट्यांचे जाळे उभे राहिले आहे. तोक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला होता. या पार्श्वभूमीवर दोन दिवस नुसते वादळ वारे घोंघावल्याने वीटभट्टी चालकांचा जीव भांड्यात पडला होता. बुधवारी सायंकाळी मात्र पैठण परिसरास जोरदार पावसाने झोडपून काढले. पावसाच्या तडाख्यात भाजण्यासाठी तयार असलेल्या लाखो विटांचा चिखल झाला.
चार कोटींचे नुकसान.....
परिसरातील वीटभट्ट्यावर साधारणपणे ८० ते ९० लाख कच्च्या वीटांचा माल तयार होता या विटाभिजल्या असून त्यांचे चिखलात रूपांतर होणार आहे. या विटांंचा चिखल झाल्याने एकंदरीत तीन ते चार कोटी रूपयांचे नुकसान झाले असे वीटभट्टी मालक संतोष धापटे यांनी सांगितले.
शेवटचा माल आमचा नफा असतो
सध्या वीटभट्टी हंगामाचा शेवट सुरू आहे. पावसाने जो माल भिजला तो शेवटचा माल होता. परराज्यातील मजूर वीटा थापून परत गेले आहेत. चिखलाच्या परत विटा थापण्यासाठी आता मजूर उपलब्ध नाहीत. विटभट्टी मालकासाठी शेवटच्या भट्ट्या हाच नफा असतो. मात्र, दुर्दैवाने अवकाळी पावसाने संपूर्ण माल भिजल्याने वीटभट्टी मालकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी वीटभट्टी मालक पवन शिसोदे यांनी केली.