मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे चार कोटींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 03:22 PM2020-10-02T15:22:02+5:302020-10-02T15:22:45+5:30
शेतकऱ्यांसाठी नगदी पीक म्हणून समजले जाणारे मूग, भुईमूग, उडीद या पिकांची पावसामुळे नासाडी झाली असून परिसरातील शेतकऱ्यांचे अंदाजे चार कोटींचे नुकसान झाले आहे.
बाबरा : गेल्या पंधरवाड्यात बाबऱ्यासह परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसाठी नगदी पीक म्हणून समजले जाणारे मूग, भुईमूग, उडीद या पिकांची पावसामुळे नासाडी झाली असून परिसरातील शेतकऱ्यांचे अंदाजे चार कोटींचे नुकसान झाले आहे.
यंदा सुरूवातीपासूनच चांगला पाऊस असल्याने पिके दमदार आली होती. त्यामुळे अपेक्षित उत्त्पन्न मिळेल, या आशेने शेतकरीही सुखावले होते. परंतु गेल्या पंधरवाड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले.
पावसामुळे पिकांची नासाडी तर झाली आहेच पण पिके काढण्यासाठीही आता मोठा खर्च येणार असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. पावसामुळे बाबरा व परिसरात मुगाच्या एकूण तीन कोटी तर भुईमुगाच्या एक कोटीच्या उत्पन्नाला शेतकरी मुकले आहेत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.