शिक्षकांच्या गोवर, रुबेला प्रशिक्षणामुळे सोयगावातील शाळा चार दिवस रामभरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 05:59 PM2018-10-04T17:59:05+5:302018-10-04T17:59:26+5:30
कार्यशाळेसाठी तालुक्यातील निम्म्याहून अधिक शाळांच्या शिक्षकांना जुंपण्यात येणार असल्याने जवळपास चार दिवस शाळा राभभरोसे चालणार आहे.
सोयगाव (औरंगाबाद) : गोवर, रुबेला लसीकरणाच्या प्रशिक्षण कार्यशाळेसाठी तालुक्यातील निम्म्याहून अधिक शाळांच्या शिक्षकांना जुंपण्यात येणार असल्याने जवळपास चार दिवस शाळा राभभरोसे चालणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. विशेष म्हणजे प्रशिक्षण कार्यशाळेत शिक्षकांना हजर राहणे बंधनकारण करण्यात आले आहे. प्रशासनाच्या या कारभाराविरुद्ध पालकांनी रोष व्यक्त केला आहे. या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
शासनाच्या गोवर, रुबेला लसीकरणाच्या प्रशिक्षण कामात शिक्षकांनाही जुंपल्याने तालुक्यातील ९३ प्राथमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या १७ हजारांवरून जास्त विद्यार्थ्यांचे भवितव्य ऐन प्रथम सत्राच्या तोंडावर धोक्यात आले आहे. ५ आॅक्टोबरपासून दोन टप्प्यांत सुरू होणाऱ्या प्रशिक्षण कार्यशाळेत पहिल्या टप्प्यात ५० टक्के आणि दुसऱ्या टप्प्यात ५० टक्के शिक्षकांना केंद्रस्तरावर प्रशिक्षणाचे डोस दिले जाणार आहे.
दरम्यान, ९३ प्राथमिक शाळांच्या ९ केंद्रांतील ४५१ शिक्षकांना दोन टप्प्यांत प्रशिक्षणाला उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले असल्याची लेखी सूचना बुधवारी गटशिक्षण विभागाला प्राप्त झाली आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या १७ हजार विद्यार्थ्यांना विनाशिक्षक ज्ञानार्जन करावे लागणार आहे. यासंबंधित सूचना तातडीने तालुक्यातील केंद्रस्तरावर पोहोचविण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात बनोटी, तिडका, वडगाव, सावळदबारा, फर्दापूर, सोयगाव, जरंडी या आठ केंद्रांतील शिक्षकांना प्रशिक्षण कार्यशाळेसाठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.