उस्मानाबाद उपकेंद्रात नव्याने सुरू होणार चार विभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 04:48 PM2019-01-20T16:48:55+5:302019-01-20T16:49:10+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद येथील उपकेंद्रात नव्याने चार विभाग सुरू करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद येथील उपकेंद्रात नव्याने चार विभाग सुरू करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. विद्यापीठाला मिळालेल्या तीनपैकी एक इन्क्युबेशन केंद्र उपकेंद्रात सुरू करण्याविषयीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेची बैठक शनिवारी झाली. या बैठकीत ३० विषयांवर चर्चा होऊन मंजुरी देण्यात आली. उस्मानाबादच्या उपकेंद्रात नाट्यशास्त्र, लोककला, गणित आणि आॅर्गनिक केमिस्ट्री हे विभाग सुरू करण्याचा ठराव चर्चेला आला. उपकेंद्रात विभाग सुरू करण्यासाठी कुलगुरू अनुकूल नव्हते.
मात्र, ज्येष्ठ सदस्य संजय निंबाळकर यांनी जोरदार बाजू मांडली. इतरही सदस्यांनी मते मांडल्यानंतर चार विभाग सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली. याशिवाय विद्यापीठाला तीन इन्क्युबेशन केंद्र मिळाले आहेत. यापैकी एक केंद्र उपकेंद्रात सुरू करावे, असा प्रस्ताव निंबाळकर यांनी मांडला. मात्र, त्यासही विरोध झाला. त्याविषयीचा अभिप्राय शासनाकडून मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. नोकरीतील प्राध्यापकांनाही एम.फील. आणि पीएच.डी. करता यावी, यासाठी परिनियमांमध्ये बदल करण्यासाठीचा विषय अधिष्ठाता मंडळाकडे पाठविण्यात येणार आहे.
रमेश जाधव यांच्यावर कारवाईचा निर्णय
मराठी विभागातील प्राध्यापक डॉ. रमेश जाधव यांनी छळ केल्याची तक्रार त्यांच्या मार्गदर्शनाखालील संशोधक माणिक शिंदे यांनी केली होती. यावर नेमलेल्या कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड, डॉ. सतीश दांडगे आणि डॉ. भगवान साखळे यांच्या चौकशी समितीने कुलगुरूंना सादर केलेला अहवाल व्यवस्थापन परिषदेत चर्चेला आला. अहवालात डॉ. जाधव यांच्यावर कडक ताशेरे ओढण्यात आले आहेत. त्यामुळे सदस्यांनी अशा प्राध्यापकांवर कडक कारवाई करण्याची बाजू लावून धरली. यानुसार डॉ. जाधव यांची मॉडेल कॉलेज घनसावंगी येथे बदली, गाईडशिप रद्द आणि मराठी विभागाचे प्रमुखपद न देण्याचा ठराव एकमताने मंजूर केला. डॉ. जाधव यांच्यावर कारवाई करण्यासाठी संशोधक विद्यार्थ्यासह राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अमोल दांडगे यांनी अनेकदा आंदोलन केले होते. शिक्षणशास्त्र विभागाच्या माजी विभागप्रमुख डॉ. शोभना जोशी यांच्याविषयीचा ठराव चर्चेला आला. मात्र, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे तूर्तास बाजूला ठेवण्यात आले.
अर्थसंकल्पाला मंजुरी
विद्यापीठाच्या अर्थसंकल्पाला व्यवस्थापन परिषदेने मंजुरी दिली. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही तुटीचा अर्थसंकल्प असणार आहे. ही तूट तब्बल ४१ कोटी रुपये एवढी असेल. एकूण अर्थसंकल्प ३१८ कोटी रुपयांचा असल्याची माहिती सदस्य किशोर शितोळे यांनी दिली. याशिवाय इतरही विषयांवर चर्चा झाली. यात विविध समित्यांची स्थापना केली आहे.