कला, क्रीडासाठी आता चार-चार तासिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 12:35 AM2017-10-14T00:35:31+5:302017-10-14T00:35:31+5:30

शाळांमध्ये प्रत्येक वर्गाला आठवड्यामध्ये कला व क्रीडासाठी असलेल्या चार- चार तासिकांऐवजी दोन- दोन तासिका करण्याचा निर्णय शासनाने लागू केला होता.

Four-four periods for arts and sports now | कला, क्रीडासाठी आता चार-चार तासिका

कला, क्रीडासाठी आता चार-चार तासिका

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शाळांमध्ये प्रत्येक वर्गाला आठवड्यामध्ये कला व क्रीडासाठी असलेल्या चार- चार तासिकांऐवजी दोन- दोन तासिका करण्याचा निर्णय शासनाने लागू केला होता. यासंदर्भात राज्यभरात ललित कलाशिक्षक संघटनेने तीव्र आंदोलन केले. अखेर शासनाला आंदोलनापुढे झुकावे लागले आणि कमी केलेल्या तासिका पूर्ववत चार- चार लागू केल्या.
शालेय शिक्षण विभागाने ललित कला संघटना किंवा विषय तज्ज्ञ, विद्वत सभेला विचारात न घेता आठवड्यातील कला व क्रीडा विषयांसाठी असलेल्या तासिका परस्पर कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यभरातील कला व क्रीडा शिक्षकांमध्ये असंतोष पसरला. महाराष्ट्र राज्य ललित कलाशिक्षक संघटनेने शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या या निर्णयाविरुद्ध राज्यभरात आंदोलन उभारले.
ललित कलाशिक्षक संघटनेने शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले की, कला विषयात चित्र, शिल्प, नृत्य, नाट्य, गायन, वादन आदी सहा प्रकारच्या कलांचा समावेश आहे. असे असताना केवळ दोन तासिकांमध्ये आनंददायी शिक्षणाची अंमलबजावणी कशी होईल. या माध्यमातून शाळांमध्ये कला व क्रीडा अभ्यासक्रम मोडीत काढण्याचा घाट रचला जात आहे, या शब्दात संघटनांच्या पदाधिका-यांनी आपला रोष व्यक्त केला. शासनाच्या या निर्णयामुळे कला-क्रीडा शिक्षकांना अतिरिक्त होण्याची भीती होती.
अखेर संघटनेच्या पदाधिका-यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे शिक्षण विभागाने पूर्ववत तासिका घेण्याचे मान्य केले.
दरम्यान, शिक्षण विभागाने घेतलेल्या या फेर निर्णयामुळे कला व क्रीडा शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. यासाठी ललित कलाशिक्षक संघटनेचे प्रल्हाद शिंदे- हस्तेकर, चंद्रकांत लिंबेकर, विवेक महाजन, मधुकर पाटील, राजेश निंबेकर, संजय जाधव, रामचंद्र दर्प, दत्तात्रय पवार, अशोक सोळंके, भास्कर शिंदे, समाधान तायडे आदी प्रमुख पदाधिका-यांनी घेतलेल्या परिश्रमाला यश आले.

Web Title: Four-four periods for arts and sports now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.