चार बकऱ्यांचा बिबट्याने पाडला फडशा
By | Published: December 2, 2020 04:10 AM2020-12-02T04:10:23+5:302020-12-02T04:10:23+5:30
शेकटा : औरंगाबाद तालुक्यातील करजगावात रविवारी सकाळी बिबट्याने गोठ्यातील बकऱ्यावर हल्ला करून चार बकऱ्यांंचा फडशा पाडून सात बकऱ्यांना जखमी ...
शेकटा : औरंगाबाद तालुक्यातील करजगावात रविवारी सकाळी बिबट्याने गोठ्यातील बकऱ्यावर हल्ला करून चार बकऱ्यांंचा फडशा पाडून सात बकऱ्यांना जखमी केले. या घटनेनंतर वनविभागाच्या पथकाने संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र, बिबट्या कुठेच आढळून आला नाही. करजगावातील हा हल्ला बिबट्याचा नसल्याचा खुलासा वन विभागाने केला आहे. कारण हल्ला झालेल्या परिसरात बिबट्याच्या पायांच्या ठशाची पाहणी करण्यात आली; पण ते ठसे बिबट्याचे पायाचे नसल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.
करमाड, पिंप्रीराजा, गोलटगाव, आडगाव, कौडगाव, कोळघर, सटाणा, शिवारात बिबट्या असल्याची चर्चा होती. त्यातच रविववारी पहाटे करजगाव शिवारात सुदाम भेरे यांच्या शेतातील बंदिस्त जाळीत बिबट्याने प्रवेश करीत ४ बकऱ्यांंचा फडशा पाडून ७ बकऱ्यांंना जखमी केले. बकऱ्यांची आरडाओरड ऐकून शेजारील शेतकऱ्यांनी यांची माहिती सुदाम भेरे यांना दिली. माहिती मिळताच सुदाम भेरे आपल्या मुलासोबत शेतात गेले असता त्यांना दुचाकी लाइटच्या उजेडात बिबट्या बकऱ्या फाडताना दिसला. त्यांनी आरडाओरड केल्याने इतर शेतकरी मदतीसाठी येईपर्यंत बिबट्या निघून गेला होता. याची माहिती वनविभाग व करमाड पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी आले. मात्र, हा हल्ला बिबट्याचा नसून इतर प्राण्याचा असल्याचे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्या सांगण्यानुसार जर बिबट्या असता तर शेतात त्याच्या पायांचे ठसे आढळून आले असते.
-------
- वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सकाळीच घटनास्थळासह परिसरातील प्राण्यांच्या पायाच्या ठशाची पाहणी केली असता बिबट्याचे पदमाग दिसून आले नाही. सदर पदमाग हे वन्यजीव अभ्यासकांनी तडस या प्राण्यांचे असल्याचे सांगितले; परंतु शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार तो बिबट्याच होता. बिबट्याच्या धास्तीने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
- वनरक्षक के. पी. शिंदे म्हणाले की, बिबट्याचे वास्तव्य निश्चित नसल्यामुळे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे. या घटनेमुळे परिसरात प्रंचड दहशत पसरली असून, शेतात जाणाऱ्या महिलांसह रात्री रबी पिकाला पाणी देणारे शेतकरी धास्तावले आहेत.
- शेतकऱ्यांनी आपले जनावरे बंदिस्त ठेवावे, रात्रीच्या वेळेस शेतात एकट्याने जाण्याचे टाळावे, लहान मुलांना व महिलांना शेतात निर्मनुष्य ठिकाणी पाठवू नये यासह कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. बिबट्या दिसला तर तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागाकडून केले आहे.