धारला शिवारात बिबट्याने पाडला चार बकऱ्यांचा फडशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:06 AM2021-02-06T04:06:21+5:302021-02-06T04:06:21+5:30
घाटनांद्रा : येथून जवळच असलेल्या धारला शिवारात गुरुवारी रात्रीच्या सुमारास गोठ्यात बांधलेल्या शेतकऱ्याच्या चार बकऱ्यांचा बिबट्याने फडशा पाडला. ...
घाटनांद्रा : येथून जवळच असलेल्या धारला शिवारात गुरुवारी रात्रीच्या सुमारास गोठ्यात बांधलेल्या शेतकऱ्याच्या चार बकऱ्यांचा बिबट्याने फडशा पाडला. यामुळे या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
धारला गावापासून थोड्याच अंतरावर एकनाथ पांडुरंग वानखेडे यांच्या गट नंबर ४० मध्ये शेतजमीन आहे. येथील गोठ्यात ते बकऱ्यांना बांधून ठेवतात. गुरुवारी सायंकाळी त्यांनी बकऱ्यांना चारा-पाणी करून ते घरी गेले. रात्री बिबट्याने पायाने दरवाजाखालून उकरुन गोठ्यात प्रवेश केला व गोठ्यात बांधलेल्या एकनाथ वानखेडे यांच्या चार बकऱ्यांना ठार केले. तीन शेळ्या जागेवर सोडून एका बकरीला जंगलाकडे फरफटत नेऊन तिचा फडशा पाडला.
सकाळी शेतकरी एकनाथ वानखेडे हे शेतात आले असता त्यांच्या ही बाब लक्षात आली. यावेळी त्यांनी वनविभागाला याची माहिती दिल्यावर वनपाल चव्हाण व चौकीदार राजपूत व डॉ. महाकाळ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पंचनामा करुन पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. झालेल्या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. शेताजवळून थोड्याच अंतरावर डोंगर असल्याने या परिसरात वन्यप्राण्यांचा मोठा वावर आहे. वनविभागाने शेतकऱ्यास नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य रफिकमिया देशमुख, सुखदेव मोटे, प्रदीप बोरसे, नामदेव नागरे, शेखर शिरसाट, तुकाराम ढोके आदी शेतकऱ्यांनी केली आहे.