किल्ल्यातील चोरी प्रकरणी चौघे जेरबंद
By Admin | Published: October 10, 2016 12:17 AM2016-10-10T00:17:01+5:302016-10-10T00:19:11+5:30
परंडा : शहरातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यातील बुरजावरील पंचधातू तोफेच्या सिंहाचे तोंड, मुठीची मागील रविवारी चोरट्यांनी चोरी केली होती़ या चोरी प्रकरणात पोलिसांनी कारवाई करून चौघांना ताब्यात घेतले
परंडा : शहरातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यातील बुरजावरील पंचधातू तोफेच्या सिंहाचे तोंड, मुठीची मागील रविवारी चोरट्यांनी चोरी केली होती़ या चोरी प्रकरणात पोलिसांनी कारवाई करून चौघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे़
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परंडा शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या पूर्व भागातील बुरुजावरील उत्तर दिशेला तोंड असलेल्या मुलूख मैदान तोफेच्या सिंहाचा पंचधातूचा भाग व मगर तोफेच्या उर्वरित मुठीचा भाग २ आॅक्टोबर रोजी चोरीस गेला होता़ याबाबत चौकीदार ज्ञानेश्वर गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वीही पंचधातू तोफेच्या अवषेशाचा भाग चोरून नेल्याप्रकरणात गुन्हा दाखल आहे़ मात्र, त्या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना अपयश आले आहे़ त्यातच २ आॅक्टोबर रोजी पुन्हा चोरी झाल्याने पोलीस प्रशासनासमोर आव्हान उभा राहिले होते़ या चोरीच्या तपासकामी लागलेल्या परंडा ठाण्यातील पोलीस यंत्रणेला खबऱ्यामार्फत चौघांची नावे मिळाली होती़ मिळालेल्या माहितीनंतर शनिवारी पोलीस आधिक्षक पंकज देशमुख, उपविभागीय आधिकारी सिध्देश्वर धुमाळ, पोनि डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना कल्याण पवार, पोना सुरेश चौधरी, पोकॉ बाबासाहेब जाधवर, पोकॉ श्रीमंत क्षीरसागर यांनी शनिवारी सायंकाळी परंडा शहरातील विविध भागातून तोफिक उर्फ बाग्या इसाकशहा शहाबर्फीवाले (वय-१९), सलमान अमर सय्यद (वय-२०), उमर तान्विर मशायक (वय-१८) व तोफिक इस्माईल शेख (वय-१९ ) या चौघांना मुद्देमालासह गजआड केले़