शिर्डीला दर्शनासाठी जातांना कार अपघातात चार ठार, दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 01:01 PM2019-11-30T13:01:25+5:302019-11-30T13:15:52+5:30
अपघातात दोघे जण जखमी आहेत
औरंगाबाद : शिर्डीला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची भरधाव कार झाडावर आढळून झालेल्या अपघातात चार जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी रात्री दोनच्या सुमारास औरंगाबाद नगर रस्त्यावरील गोलवाडी फाट्याजवळ घडला. चालक दत्ता वसंतराव डांगे (वय 30), अक्षय सुधाकर शिलवंत (वय 30) आकाश प्रकाश मोरे (वय 30) अमोल नंदकिशोर गव्हाळकर (वय 22 सर्व रा शेवली ता जि जालना) यांचा मृत्यू झाला. तर संतोष राऊत (वय 17) व किरण गिरी (वय 16) हे जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, जालना तालुक्यातील शेवली येथील पाच महाविद्यालयीन तरुणांनी शिर्डी येथे दर्शनाला जाण्यासाठी किरायाने कार केली. चालकसह सहा जण कारमध्ये शेवलीहून शुक्रवारी रात्री नऊ वाजता शिर्डीकडे निघाले. जालना जवळ एका हॉटेलात जेवण करून पुढील प्रवासाला निघाले. दरम्यान, काही जण झोपी गेले. औरंगाबाद ओलांडून गोलवाडी फाट्याजवळून जातांना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या वडाच्या झाडावर आदळली. त्यात चालकासह तिघांचा जागीच तर एकाचा घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच छावणी पोलीस स्टेशनचे पोहेकॉ संजय वामने, आर. डी. वडगावकर, पी. एस. अडसूळ व कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी अपघात ग्रस्तांना घाटी रुग्णालयात दाखल केले. सकाळी चार च्या सुमारास चालक दत्ता डांगे, आकाश मोरे (वय 30) व अमोल गव्हाळकर यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर अक्षय शिलवंत याचा ट्रॉमा केअर मध्ये उपचारा दरम्यान सकाळी साडे चार वाजता मृत्यू झाला. तर जखमी संतोष राऊत व किरण गिरी यांच्यावर उपचार सुरू आहे. त्यातील संतोष किरकोळ तर किरण गंभीर जखमी आहे.