महाराष्ट्रात चार कोटी जनता व्यसनी; दरवर्षी 'एकच प्याला' घेतो ३ लाख जणांचा जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 04:21 PM2018-04-04T16:21:39+5:302018-04-04T16:37:39+5:30
महाराष्ट्रातील सुमारे चार कोटी जनता व्यसनी असल्याचे व दारूमुळे दरवर्षी ३ लाख ५३ हजार ५८४ मृत्यू होत असल्याची माहिती व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाने दिली आहे.
औरंगाबाद : महाराष्ट्रातील सुमारे चार कोटी जनता व्यसनी असल्याचे व दारूमुळे दरवर्षी ३ लाख ५३ हजार ५८४ मृत्यू होत असल्याची माहिती व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाने दिली आहे. एका सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आल्याचे मंचने म्हटले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील गल्लीबोळांत व्यसनासाठी दारू, तंबाखू, गुटखा, तपकीर, खर्रा, सिगारेट, अफू, गांजा, ताडी इ. वैध व अवैध प्रकारात सहज उपलब्ध होत आहेत. यात सुमारे चार कोटी जनता कुठल्या ना कुठल्या व्यसनात अडकली आहे. याप्रमाणे सरासरी प्रत्येक कुटुंबात एक तरी व्यक्ती ही व्यसनाधीन आहेच. दरवर्षी सुमारे ३ लाख ५३ हजार ५८४ पेक्षा जास्त नागरिक दारू प्याल्यामुळे मृत्युमुखी पडत आहेत. म्हणजे ४५ हजार कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. ग्रामीण भागात आता पाऊचमध्ये अवैध दारू उपलब्ध होत आहे. सुमारे १२ ते साडेबारा लाख इतकी दारू विक्रेत्यांची संख्या आहे. हे लोक वैध, अवैध दारू विकतात.
सुमारे १०० संस्था, संघटनांच्या सहभागाने व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचची स्थापना करण्यात आली आहे. अविनाश पाटील, माधव बावगे, वर्षा विद्या विलास आदींचा यात समावेश आहे. महाराष्ट्रातील महिलांच्या संख्येतील २५ टक्केमहिला दारूसारख्या व्यसनाच्या अधीन झालेल्या पतीकडून रोज अमानुष मारहाण, मानसिक त्रास सहन करतात. ६२ टक्के नागरिकांचा आक्षेप आहे की, स्थानिक पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे, हप्तेखोरीमुळे अवैध दारू, गुटखा यासारखी व्यसने बंद होत नाहीत. २० टक्के नागरिकांनी राजकीय नेते, पुढारी व लोकप्रतिनिधी यांना जबाबदार धरले आहे. ६४ टक्केनागरिकांचे म्हणणे आहे की, दारू विक्रेत्यांना पर्यायी कामधंदा उपलब्ध आहे; परंतु श्रम न करता पैसे कमविण्याच्या लालसेपोटी हे काम केले जाते.
महाराष्ट्रातील सुमारे १० जिल्ह्यांमध्ये दारूबंदी करण्याची मागणी तेथील महिला, युवा आणि सामाजिक- राजकीय संस्था, संघटनांकडून केली जात आहे. ती मान्य करून दारूबंदी केली पाहिजे व वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांतील दारूबंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली पाहिजे. २०२० हे महाराष्ट्राचे हीरकमहोत्सवी वर्ष आहे.