‘सिव्हिल’ला चार महिन्यानंतर कोरोना रुग्ण एकेरी संख्येत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:04 AM2021-07-08T04:04:12+5:302021-07-08T04:04:12+5:30
औरंगाबाद : तब्बल चार महिन्यानंतर जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या एकेरी आकड्यात आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ...
औरंगाबाद : तब्बल चार महिन्यानंतर जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या एकेरी आकड्यात आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत याठिकाणी एकाच वेळेस ३०० रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. आजघडीला येथे अवघे आठ कोरोना रुग्ण दाखल आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने १ जुलैपासून याठिकाणी ओपीडी सुरू करण्यात आली. अवघ्या सात दिवसात ओपीडीतील रुग्णसंख्या शंभरावर गेली आहे. ओपीडीत मंगळवारी १५०, तर बुधवारी ११२ रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. कमलाकर मुदखेडकर यांनी दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे २०० खाटांचे जिल्हा रुग्णालय ३०० खाटांचे करण्यात आले. या सर्व खाटा मार्च, एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णांनी भरून गेल्या होत्या. परंतु आता येथील रुग्णसंख्येत मोठी घसरण झाली आहे. याठिकाणी आठ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असून, यात एक रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती रुग्णालयातर्फे देण्यात आली.
घाटीत ६४ रुग्ण दाखल
घाटी रुग्णालयात सध्या कोरोनाच्या ६४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. घाटीतही दोन महिन्यापूर्वी एकाच वेळी ६०० कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात आले होते.