निवड होऊन चार महिने उलटले; तलाठी झालेले युवक नियुक्तीपत्राच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 06:29 PM2020-07-16T18:29:02+5:302020-07-16T18:39:34+5:30
राज्यातील २७ जिल्ह्यांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देत सेवेत सामावून घेतले असल्याची माहिती निवड झालेल्या युवकांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
औरंगाबाद : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तलाठी पदाच्या १,८०० जागांसाठी जुलै २०१९ मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. यात औरंगाबाद जिल्ह्यात ५६ पदांसाठी परीक्षा झाली. यातील गुणवत्ता यादीतील युवकांच्या कागदपत्रांची पडताळणी ९ ते ११ डिसेंबर २०१९ दरम्यान झाली. यानंतर अंतिम निवड यादी १९ मार्च २०२० रोजी जाहीर करण्यात आली. मात्र, अद्यापही यातील निवड झालेल्या युवकांना नियुक्तीपत्रे देण्यात आलेली नाहीत. राज्यातील २७ जिल्ह्यांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देत सेवेत सामावून घेतले असल्याची माहिती निवड झालेल्या युवकांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
राज्यात मागील पाच वर्षांपासून नोकरभरतीवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नोकरभरतीवरील बंदी हटविण्यात आली होती. यानुसार मार्च २०१९ मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांत तलाठी पदाच्या १,८०० जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. औरंगाबाद जिल्ह्यातील यातील ५६ पदांची भरती होती. यासाठी हजारो युवकांनी अर्ज दाखल केले होते.
जिल्ह्यात २ ते २६ जुलैदरम्यान परीक्षा घेण्यात आली. यानंतर २५ जिल्ह्यांतील निवड प्रक्रिया मार्च महिन्याच्या पूर्वीच पूर्ण झाली आहे. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यात मागे आहे. निवड झालेल्या युवकांना नियुक्ती देण्यासही टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप उमेदवारांनी केला आहे. राज्य शासनाने ४ मे २०२० रोजी शासन निर्णय काढून कोविड-१९ आजाराच्या पार्श्वभूमीवर वित्तीय उपाययोजना करण्यासाठी नवीन पदभरती करण्यावर बंदी घातली. मात्र, जिल्हा प्रशासन त्या शासन निर्णयाचा आधार घेऊन नियुक्त्या देत नाही, असा आरोपही युवकांनी केला आहे. मात्र, नाशिक जिल्हा प्रशासनाने या तलाठी भरतीमधील नियुक्त्या २३ जून रोजी दिल्या आहेत.
पुणे जिल्हा प्रशासनानेही १ जून रोजी नियुक्ती दिल्याकडे निवड झालेल्या युवकांनी लक्ष वेधले आहे. याविषयी युवकांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीही नवीन भरतीला स्थगिती दिलेली आहे. जुन्या नियुक्त्यांना बंदी नसल्याचे स्पष्ट केले. तरीही औरंगाबाद जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे युवकांनी सांगितले.
महसूल सचिवांचे मार्गदर्शन मागविले
औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने तलाठी भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी महसूल व वन विभागाचे अप्पर मुख्य सचिवांकडे १८ मे रोजी मार्गदर्शन मागविले आहे. यात ४ मे रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयाचा उल्लेख केलेला आहे. यात उमेदवारांनी नियुक्ती देण्यासंदर्भात मार्गदर्शन करावे, अशी विनंती जिल्हा प्रशासनाने केलेली आहे. यासही महिना होत आला आहे. याबद्दल अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे निवड झालेले विद्यार्थी हवालदिल आहेत.