वडगाव-बजाजनगरमधून चारजण तडीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:33 AM2019-04-20T00:33:31+5:302019-04-20T00:33:41+5:30
वडगाव-बजाजनगरच्या सरपंचाच्या पती व दिरासह अन्य चौघांना वाळूज एमआयडीसी व दौलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तडीपार केले आहे.
वाळूज महानगर : वाढत्या गुन्हेगारी कारवायामुळे पोलीस प्रशासनाने वडगाव-बजाजनगरच्या सरपंचाच्या पती व दिरासह अन्य चौघांना वाळूज एमआयडीसी व दौलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तडीपार केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी सांगितले.
सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून, वाळूजमहानगरात निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, यासाठी गुन्हेगारांचे रेकार्ड तयार करुन त्यांना तडीपार करण्यासाठी पोलीस आयुक्त व उपायुक्तांकडे प्रस्ताव पाठविला होता. याची गंभीर दखल घेत उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील यांनी विविध गुन्हेगारी कारवायात सहभागी असलेल्या चौघांना तडीपार करण्याचे आदेश बजावले आहेत.
वडगाव-बजाजनगरच्या सरपंच उषा साळे यांचे पती एकनाथ तुकाराम साळे, दीर उद्धव तुकाराम साळे याला एक महिन्यासाठी, तर संदीप उर्फ बंडु भाऊसाहेब वाघ याला तीन आणि जोगेश्वरीतील राहुल अशोक खंडागळे याला एक वर्षासाठी तडीपार केले आहे.आठ महिन्यांपूर्वी वडगाव-ग्रामपंचायतीमध्ये हाणामारीप्रकरणी एकनाथ साळे याच्याविरुध्द गुन्हा दाखल झालेला आहे.