बससमोर बाईक आडवी लावून चालकाला चौघांची बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 07:45 PM2021-02-08T19:45:09+5:302021-02-08T19:45:45+5:30
दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पैठण : बस वळवायला तुला ईतकी जागा लागते का असे म्हणत, एसटीला मोटारसायकल आडवी लावून चालकास कॅबीनमधून खाली ओढून बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी १ वाजता घडली. याप्रकरणी चार जणाविरोधात पैठण पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास चालक मिथुन गायकवाड हे पैठण-गोपेवाडी ( बस क्र . एम.एच. ४०.एन ९७७५ ) ही बस पैठण येथून गोपेवाडीकडे घेवून जात होते. शहागड फाटा येथे दुपारी १ वाजेच्या दरम्यान बस वळत असताना सय्यद मुजम्मील सय्यद मेहमुद ( रा. साळीवाडा, पैठण ) याने अचानक बससमोर बाईक आडवी लावली. यानंतर त्याने चालकास शिवीगाळ करत, 'तुला बस वळवायला ईतकी जागा लागते का' असे म्हणत त्याला कॅबीनमधून खाली ओढून मारहाण केली. वाहकाने लागलीच हस्तक्षेप करत दोघांना बाजूला घेतले. दरम्यान, सय्यद मुजम्मील याने फोन करून तेथे काही जणांना बोलावून घेतले. त्यानंतर तेथे आलेल्या सय्यद मोईज सय्यद मेहमुद ( रा. साळीवाडा पैठण ) याने चालक गायकवाड यास बाजूला ओढत नेत तेथील गँरेज चालक व तिघांनी मिळून बेदम मारहाण केली.
वाढत जाणार वाद पाहून नागरिकांनी याची माहिती पैठण पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी येताच त्यातील दोघे जण पळून गेले. तर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यानंतर चालक गायकवाड यांनी बस पोलीस ठाण्यात आणून फिर्याद दिली. यावरून चारही आरोपींविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे पुढील तपास करत आहेत.