बीड उपविभागातील ५ पैकी ४ पोलीस ठाणे ‘लॉकअप’विनाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:45 PM2017-11-12T23:45:24+5:302017-11-12T23:45:27+5:30
एका आयएसओ मानांकनप्राप्त ठाण्यासह तीन ठाण्यांना ‘लॉकअप’ची सुविधा नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे
सोमनाथ खताळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणी आयएसओ करण्यासाठी एकीकडे प्रयत्न सुरू आहेत, तर दुस-या बाजूला एका आयएसओ मानांकनप्राप्त ठाण्यासह तीन ठाण्यांना ‘लॉकअप’ची सुविधा नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. केवळ बीड शहर ठाण्यातच ही सुविधा असून, चारही ठाण्याचे आरोपी येथे डांबले जातात. ‘लॉकअप’ (कोठडी) नसल्यामुळे पोलिसांची नजर चुकवून आरोपी पलायन करीत असल्याच्या घटना घडत आहेत.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून संशयीत आरोपीने पलायन केल्याची घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी सय्यद सलाऊद्दीन सिद्दीकी यांना निलंबीत केले होते. हाच धागा पकडून बीड उपविभागातील ठाण्यांच्या ‘लॉक अप’ चा आढावा घेतला असता, ही माहिती समोर आली. बीड उपविभागात बीड शहर, बीड ग्रामीण, शिवाजीनगर, पेठबीड व पिंपळनेर अशी पाच पोलीस ठाणी
येतात.
या पाचपैकी केवळ बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये आरोपींना ठेवण्यासाठी ‘लॉकअप’ची सुविधा करण्यात आली आहे. याच ‘लॉकअप’मध्ये इतर सर्व ठाण्यांचे आरोपी ठेवले जातात.
वास्तविक पाहता चार ठाण्यांच्या आरोपींची वाढती संख्या लक्षात घेता शहर ठाण्यातील जागा अपुरी पडते; परंतु याकडे दुर्लक्ष करीत नाइलाजास्तव शहर ठाण्यात आरोपींना डांबणे भाग पडत आहे. त्यामुळे आरोपींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच आरोपींवर नजर ठेवणेही कर्मचा-यांसाठी जिकिरीचे बनत असून, वेळप्रसंगी त्यांना निलंबनाच्या कारवाईस बळी पडावे लागते. प्रत्येक ठाण्यात लॉक अपची सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज सर्वस्तरातून व्यक्त होत आहे.