छत्रपती संभाजीनगरात खंडणीवरून वादात गुन्हेगारांच्या टोळीकडून हवेत चार वेळा गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 13:16 IST2025-03-24T13:14:10+5:302025-03-24T13:16:54+5:30
पत्त्यांच्या क्लबचे लाखो रुपयांचे अर्थकारण या भागात सुरू असून, त्यावरून अनेकदा स्थानिक गुन्हेगारांच्या टोळ्या आणि अवैध व्यावसायिकांमध्ये तणाव निर्माण होतो.

छत्रपती संभाजीनगरात खंडणीवरून वादात गुन्हेगारांच्या टोळीकडून हवेत चार वेळा गोळीबार
छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडीत पुन्हा एकदा अवैध व्यावसायिक आणि गुन्हेगारांच्या टोळीमध्ये संघर्ष उफाळून आला आहे. एका कुख्यात गुन्हेगाराने पिस्तुलाद्वारे हवेत चार वेळा गोळीबार करत दहशत निर्माण केली. यामुळे दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. ही गंभीर घटना रविवारी रात्री १०.३० वाजता मुकुंदवाडीतील एका हॉटेलसमोर घडली.
दोन वर्षांपूर्वी मुकुंदवाडीत अल्पवयीन मुलांकडून पत्त्यांचे क्लब सुरू असल्याची धक्कादायक बाब ‘लोकमत’ने उघड केली होती. या पत्त्यांच्या क्लबचे लाखो रुपयांचे अर्थकारण या भागात सुरू असून, त्यावरून अनेकदा स्थानिक गुन्हेगारांच्या टोळ्या आणि अवैध व्यावसायिकांमध्ये तणाव निर्माण होतो. रविवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास हेल्मेट नावाचा कुख्यात गुन्हेगार आपल्या टोळीसह मुकुंदवाडीतील विमानतळाच्या भिंतीलगत असलेल्या हॉटेलसमोर पोहोचला. या परिसरात राजरोसपणे अवैध दारूविक्री आणि पत्त्यांचे क्लब सुरू आहेत. हेल्मेटने तेथे जाऊन पैशांच्या कारणावरून वाद घातला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यातच हेल्मेट आणि त्याच्या साथीदारांनी थेट पिस्तूल काढून हवेत चार गोळ्या झाडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेनंतर परिसरात घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या डिटेक्शन ब्रँच (डीबी) पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
स्थानिक पोलिसांचे अर्थकारण?
सूत्रांच्या माहितीनुसार, मुकुंदवाडी परिसरात काही महिन्यांपासून सुनील नावाचा गुन्हेगार पत्त्यांचे अड्डे चालवत आहे. अनेक गुन्हे दाखल असूनही त्याचे मुकुंदवाडी पोलिस ठाण्यातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी घनिष्ठ संबंध आहेत. काही दिवसांपूर्वी त्याला खंडणी मागण्यासाठी गेलेल्या उमेश नावाच्या गुन्हेगाराला त्याने बेदम मारहाण केली होती. ही घटना पोलिसांनी सोईस्कररीत्या दडवली. मात्र, त्यानंतर या दोन्ही गटांमध्ये अवैध व्यवसाय आणि हप्तेखोरीवरून शत्रुत्व आले.
टोळीतील प्रमुख गुन्हेगार सक्रिय
मुकेश, हेल्मेट, किशोर, बालाजी, उमेश, अमर आणि शिंदे, हे या टोळीतील गुन्हेगार रविवारी पुन्हा विमानतळाच्या भिंतीलगत गेले. तेथे त्यांनी अवैध व्यावसायिकांकडून पैशांची मागणी केली. त्यातून पुन्हा वाद उफाळून हेल्मेट व त्याच्या साथीदाराने गोळीबार केला. हेल्मेटवर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत.