दीड महिन्यात फुफ्फुस कर्करोगाच्या चार शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 11:13 PM2019-01-19T23:13:21+5:302019-01-19T23:14:08+5:30
शासकीय कर्करोग रुग्णालयात (राज्य कर्करोग) गेल्या दीड महिन्यात फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या चार शस्त्रक्रिया यशस्वी करून रुग्णांना नवीन आयुष्य दिले. शस्त्रक्रियेनंतर आता तीन रुग्ण घरी परतले असून, पैठण तालुक्यातील ६६ वर्षीय रुग्णही लवकरच घरी जाईल, असे शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विषेश कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले.
औरंगाबाद : शासकीय कर्करोग रुग्णालयात (राज्य कर्करोग) गेल्या दीड महिन्यात फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या चार शस्त्रक्रिया यशस्वी करून रुग्णांना नवीन आयुष्य दिले. शस्त्रक्रियेनंतर आता तीन रुग्ण घरी परतले असून, पैठण तालुक्यातील ६६ वर्षीय रुग्णही लवकरच घरी जाईल, असे शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विषेश कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले.
गेल्या दीड महिन्यात बीड जिल्ह्यातील ४८ वर्षीय महिला रुग्णाची निमोनेक्टॉमी, परभणी जिल्ह्यातील ६० वर्षीय रुग्णासह औरंगाबाद जिल्ह्यातील ७२ वर्षीय रुग्णाची बाईलोबेक्टॉमी, तर पैठणच्या ६६ वर्षीय रुग्णाची कासिर्नाईड ब्राँकस ही निमोनेक्टॉमी शस्त्रक्रिया झाली. या चारही शस्त्रक्रियेत बाईलोबेक्टॉमी उजव्या बाजूचे अर्धे, तर निओनेक्टॉमीत डाव्या बाजूचे पूर्ण फुफ्फुस काढण्यात कर्करोगाचे शल्यचिकित्सक डॉ. अजय बोराळकर यांच्या पथकाला यश आले.
धूम्रपान, प्रदूषण, किरणोत्सर्ग हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण आहे; परंतु बीडच्या महिला आणि पैठणच्या रुग्णाला कोणतेही व्यसन नव्हते. पर्यावरणातील प्रदूषण, वारंवार येणारा खोकला आणि श्वासाचा विकार या सगळ्यातून कर्करोगाची लागण होण्याची शक्यता असते. या शस्त्रक्रिया यशस्वीतेसाठी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता पाटील, विभागप्रमुख डॉ. अनघा वरूडकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अजय बोराळकर, डॉ. अब्दुल राफे, डॉ. केतिका पोटे, डॉ. मनोज मोरे, बधिरीकरणतज्ज्ञ डॉ. रमाकांत अलापुरे, डॉ. सोनल चौधरी, डॉ. स्नेहा सिकची, अलका साबळे यांनी परिश्रम घेतले.
चौकट
रुग्ण करणार आता जनजागृती
रुग्णालयातून गेल्यानंतर व्यसनाधीनता आणि त्यामुळे होणाऱ्या कर्करोगाच्या धोक्याची जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. रुग्णालयाच्या प्रत्येक कार्यक्रमात मीदेखील सहभागी होऊन जनजागृतीसाठी काम करीन, अशी भावना पैठण येथील रुग्णाने व्यक्त केली.
कोट,
धूम्रपानाचा कुटुंबालाही धोका
धूम्रपान करणाºयासह त्याच्या कुटुंबातील सदस्यांनाही धुरामुळे कर्करोगाचा धोका निर्माण होतो. त्यामुळे धूम्रपानापासून दूर राहिले पाहिजे. धूम्रपानात अनेक जण फिल्टर, डबल फिल्टरचा वापर करतात; परंतु तरीही फिल्टरमधून सूक्ष्म कण खोलवर पोहोचून आतमध्ये फुफ्फुसात कर्करोग निर्माण करतात.
- डॉ. अजय बोराळकर, शासकीय कर्करोग रुग्णालय