कळंबमध्ये चौघे संशयित अटकेत
By Admin | Published: November 7, 2014 12:37 AM2014-11-07T00:37:11+5:302014-11-07T00:41:45+5:30
कळंब : गुरूवारी सायंकाळच्या सुमारास संशयितरित्या दबा धरून एकत्रित जमलेल्या चौघांना कळंब पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.
कळंब : गुरूवारी सायंकाळच्या सुमारास संशयितरित्या दबा धरून एकत्रित जमलेल्या चौघांना कळंब पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. दरम्यान, या लोकांवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असून, यातील एक जण हद्दपार असल्याचेही पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.
कळंब शहरासह ईटकूर, हावरगाव, खामसवाडी, मोहा आदी ठिकाणी गेल्या काही दिवसांत घरफोडी, चोरीचे गुन्हे वाढले आहेत. या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असून, त्या दृष्टीने पोलिस यंत्रणाही सतर्क झाली आहे. असे असतानाच गुरूवारी हावरगाव रोड परिसरात काही व्यक्ती चोरीच्या उद्देशाने एकत्रित दबा धरून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून उपविभागीय पोलिस अधिकारी शिलवंत ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि चंद्रकांत सावळे, सपोनि आर. डी. पांचाळ, सपोनि आर. डी. खर्डे, मिर्झा बेग, पोउपनि सिध्दीकी, पोउपनि माने यांच्या पथकाने या चौघांना ताब्यात घेतले. अटक केलेल्यांमध्ये बड्या ऊर्फ माधव कल्याण पवार (वय ३०), पिंट्या ऊर्फ भारत राजाराम पवार (वय ३०), रविंद्र शामराव काळे (वय ३२, सर्व रा. कळंब), दादा फुलचंद पवार (वय ३०, रा. पिंपळगाव डो) यांचा समावेश आहे. या कारवाईवेळी शंकर कल्याण पवार हा फरार झाल्याचे तर अटक केलेल्यांर्पीिं बड्या पवार हा हद्दपार असल्याचे पोलिस निरीक्षक सावळे यांनी सांगितले. याप्रकरणी रात्री उशिरा भादंवि कलम ४०१, ४०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोनि सावळे करीत आहेत. दरम्यान, या कारवाईत पोलिस कर्मचारी लक्ष्मण शिंदे, मधुकर जाधव, सुनील सावंत, दीपक जाधव, मुकिंद गिरी, तस्लिमा चोपदार, राणी किरदत्त आदी कर्मचारी सहभागी झाले होते. (वार्ताहर)