चार तालुक्यांत आरोग्य तपासणी शिबिरे बंद
By Admin | Published: September 7, 2014 12:11 AM2014-09-07T00:11:36+5:302014-09-07T00:30:10+5:30
अभिमन्यू कांबळ, परभणी मानव विकास मिशनअंतर्गत जिल्ह्यातील ९ तालुक्यांपैकी चार तालुक्यांमध्ये गेल्या चार महिन्यांमध्ये एकही आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले नसून
अभिमन्यू कांबळ, परभणी
मानव विकास मिशनअंतर्गत जिल्ह्यातील ९ तालुक्यांपैकी चार तालुक्यांमध्ये गेल्या चार महिन्यांमध्ये एकही आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले नसून, एका तालुक्यामध्ये केवळ एक शिबीर घेण्यात आले असल्याने प्रशासकीय यंत्रणेचे यासंदर्भात झालेले दुर्लक्ष समोर आले आहे़
जिल्ह्यातील नऊही तालुक्यांची मानव विकास मिशन मोहीम राबविण्यासाठी निवड करण्यात आली आहे़ २००१ च्या जनगणनेनुसार व तालुक्यातील स्त्री साक्षरतेचे प्रमाण आणि २००२ च्या सर्वेक्षणानुसार ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखाली कुटुंबांचे प्रमाण हे निकष घेऊन या तालुक्यांची निवड करण्यात आली आहे़ याअंतर्गत मानव निर्देशांक वाढविण्यासाठी शासनस्तरावरून विविध योजना राबविण्यात येत आहेत़
परंतु, या योजनांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा मात्र ढेपाळल्याने शासनाचा उद्देश सफल होत नसल्याचे चित्र समोर आले आहे़ मानव विकास मिशनअंतर्गत तज्ञ डॉक्टरांकडून गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी करणे तसेच शून्य ते सहा महिने वयोगटातील बालकांची व मातांची आरोग्य तपासणी आणि औषधोपचार करणे हे उपक्रमही राबविण्यात येतात़
प्रत्येक आरोग्य केंद्रांतर्गत एका महिन्यात किमान दोन आरोग्य तपासणी शिबिरे घेणे आवश्यक करण्यात आले आहे़
परंतु, परभणी जिल्ह्यातील काही तालुक्यांचे काम मात्र याअंतर्गत असमाधानकारक असल्याचे दिसून आले आहे़ जिल्ह्यातील परभणी, सेलू, सोनपेठ व पाथरी या चार तालुक्यांत एप्रिल ते जुलै महिन्यांत एकही आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आलेले नाही़ तर मानवत तालुक्यात केवळ एक शिबीर घेण्यात आले़
जिंतूर तालुक्यात सर्वाधिक म्हणजे २० शिबिरे घेण्यात आली तर पूर्णा तालुक्यामध्ये १३ आणि गंगाखेड तालुक्यामध्ये १२ शिबिरे घेण्यात आली आहे़ पालम तालुक्यात ६ आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात आली आहेत़