नवनगरातील सात गावांत चारपट वाढ
By Admin | Published: January 2, 2015 12:27 AM2015-01-02T00:27:53+5:302015-01-02T00:49:16+5:30
औरंगाबाद : शेंद्रा एमआयडीसीलगतच्या नवनगरातील नऊपैकी सात गावांच्या रेडीरेकनरच्या दरात शासनाने जबर वाढ केली आहे. येथील जमिनींचा शासकीय दर १२ लाखांवरून ५० लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आला आहे.
औरंगाबाद : शेंद्रा एमआयडीसीलगतच्या नवनगरातील नऊपैकी सात गावांच्या रेडीरेकनरच्या दरात शासनाने जबर वाढ केली आहे. येथील जमिनींचा शासकीय दर १२ लाखांवरून ५० लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आला आहे. रेडीरेकनरमधील ही वाढ तब्बल चारपट आहे.
नवनगरातील कुंभेफळ आणि शेंद्रा ही दोन गावे गतवर्षी प्रभाव क्षेत्रात आली होती. त्यामुळे चालू वर्षी नवनगरातील लाडगाव, शेंद्राबन, वरुड काझी, गंगापूर जहांगीर, करमाड, हिवरा आणि टोणगाव ही सात गावेही प्रभाव क्षेत्रात आणण्यात आली आहेत. त्यामुळे या गावांच्या रेडीरेकनर दरात ३०० ते ५०० टक्के वाढ झाली आहे.
गतवर्षी या गावांमध्ये शेतजमिनीचे प्रतिहेक्टरी दर ११ लाख ३९ हजार ते १५ लाख रुपये यादरम्यान होते. यंदा लाडगाव येथे प्रतिहेक्टरी दर ३३ लाख रुपये करण्यात आला आहे. राज्य रस्त्यावर हाच दर प्रतिहेक्टरी ७० लाख रुपये निश्चित करण्यात आला आहे. शेंद्रा बन येथे प्रतिहेक्टरी दर ५७ लाख रुपये, तर बिनशेती संभाव्य दर ७९ लाख रुपये लागू करण्यात आला आहे. वरुड काझी आणि गंगापूर जहांगीर येथे हाच दर प्रतिहेक्टरी ३२ लाख आहे. करमाड येथे प्रतिहेक्टरी ४२ लाख आणि हिवरा येथे प्रतिहेक्टरी २७ लाख रुपये याप्रमाणे शासकीय दर निश्चित करण्यात आला आहे. करमाड येथेच रस्त्यालगतच्या जमिनीचा दर ७७ लाख रुपये प्रतिहेक्टरी निश्चित करण्यात आला आहे. टोणगाव येथे प्रतिहेक्टरी २९ लाख रुपये दर लागू केला आहे. कुंभेफळ आणि शेंद्रा या दोन गावांमधील रेडीरेकनरच्या दरात गतवर्षी ४० टक्क्यांहून अधिक वाढ करण्यात आली होती. या वाढीला अनेकांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे यंदा या दोन गावांच्या शासकीय दरात मात्र, कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.