चौफुली-करोडी फाटा रस्त्यावर जीवघेणे खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 09:47 PM2019-02-05T21:47:12+5:302019-02-05T21:47:26+5:30
मुंबई-नागपूर महामार्गावरील लिंकरोड चौफुली ते करोडी फाटा या रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले आहेत.
वाळूज महानगर : मुंबई-नागपूर महामार्गावरील लिंकरोड चौफुली ते करोडी फाटा या रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. या महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे.
या महामार्गावर रात्रंदिवस वाहनांची वर्दळ असते. मात्र, लिंकरोडपासून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे शिर्डी येथे साईबाबाच्या दर्शनासाठी परराज्यातील भाविक याच मार्गावरून ये-जा करतात. याच बरोबर वाळूज परिसरातील नागरिक व भाविक वेरूळ, दौलताबाद, खुलताबाद आदी ठिकाणी जाण्यासाठी या महामार्गाचा वापर करतात.
मात्र, रस्त्याची दुरवस्था झाल्याने भाविकांची गैरसोय होत आहे. वाळूज उद्योगनगरीतून मालवाहू वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. आ. प्रशांत बंब यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व रस्ते विकास महामंडळाकडे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा केला. त्यानंतर चार महिन्यांपूर्वी करोडी फाटा ते लासूर स्टेशनपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र, करोडी फाटा ते लिंकरोड चौफुलीपर्यंतचे डांबरीकरण वगळण्यात आल्याने वाहनधारकांत नाराजीचा सूर उमटत आहे. तीसगाव फाटा चौफुलीपासून करोडी फाट्यापर्यंत मोठ-मोठे खड्डे पडले असून, रात्रीच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
प्रस्तावित धुळे-औरंगाबाद-सोलापूर या महामार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. हा नवीन महामार्ग लिंकरोड चौफुलीमार्गे पुढे जाणार असल्यामुळे डांबरीकरणातून वगळण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, लिंकरोड चौफुलीपासून आसेगावपर्यंत पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.