कोल्हा आला रे आला ! सोयगावात कोल्ह्याच्या मुक्तसंचाराने नागरिक भयभीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 07:24 PM2020-08-20T19:24:14+5:302020-08-20T19:27:33+5:30
वेताळवाडीच्या जंगलातून भरकटलेल्या कोल्ह्याने पहाटे शहरात मुक्तसंचार सुरु केला.
सोयगाव : शहरात गुरुवारी भल्या पहाटे अचानक एका कोल्ह्याचे आगमन झाले. कोल्ह्याने मुक्तसंचार करत न्यायालयाजवळून भारत संचार कार्यालयाच्या आवारात बस्तान मांडण्याचा प्रयत्न केला असता नागरिकांनी त्याला हुसकावून लावले. या घटनेने नागरिक भयभीत झाले असून शहरात खळबळ उडाली आहे.
वेताळवाडीच्या जंगलातून भरकटलेल्या कोल्ह्याने पहाटे शहरात मुक्तसंचार सुरु केला. दारासमोरच कोल्ह्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. त्यानंतर कोल्ह्याने थेट न्यायालयाच्या प्रवेशद्वारातून बीएसएनएल कार्यालयाच्या मनोऱ्याजवळ बस्तान मांडले. याची माहिती बी.एस.एन.एल कर्मचारी शेख सुलेमान यांनी वनविभागाला दिली.
यानंतर वनपरिक्षेत्राधिकारी राहुल सपकाळे, वनपाल गणेश सपकाळ, वनरक्षक भिका पाटील, सुनील चंदवडे, निलेश मुलताने, योगेश बोखारे, सुरेश सरोदे, चंद्रकांत इंगळे, कृष्ण पाटील, मधुकर साळवे यांच्या पथकाने न्यायालयाचे आवार, शहराजवळील शेत, गलवाडा रस्ता या तीन ठिकाणी पिंजरा लावला. मात्र, कोल्हा जेरबंद करण्याच्या सात तासांच्या मोहिमेला यश आले नाही. पावसामुळे मोहिमेत अनेकवेळा व्यत्यय आला, कोल्हा शहरातून गलवाडा आणि वेताळवाडीच्या दिशेने पळाल्याचे पथकांने सांगितले. शुक्रवारी औरंगाबादची रेस्कू टीम या मोहिमेत सहभागी होणार असल्याची माहिती आहे.
घाबरण्याचे कारण नाही
सोयगावच्या जंगलात पूर्वीपासून कोल्ह्याचे वास्तव्य आहे. परंतु, शहरात आलेला हा कोल्हा गौताळा अभयारण्यातून आल्याचा अंदाज आहे. तो कोल्हा माणसाळलेला असून नागरिकांनी घाबरून जावू नये.
- राहुल सपकाळे, वनपरिक्षेत्र अधिकारी सोयगाव