वाकी येथील नळकांडी पुलाला भगदाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:04 AM2021-09-24T04:04:47+5:302021-09-24T04:04:47+5:30
चिंचोली लिंबाजी : कन्नड तालुक्यातील नेवपूरजवळील पूर्णा नदीवरील पूल वाहून गेला. तर याच नदीवरील वाकी येथील नळकांडी पुलाला मोठे ...
चिंचोली लिंबाजी : कन्नड तालुक्यातील नेवपूरजवळील पूर्णा नदीवरील पूल वाहून गेला. तर याच नदीवरील वाकी येथील नळकांडी पुलाला मोठे भगदाड पडल्याने दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी बंद पडले आहेत. चिंचोली लिंबाजी गावाशी आजूबाजूच्या पाच गावांचा संपर्क तुटला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही मार्गांवरील शिवेश्वर व शनेश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या भाविकांचा हिरमोड झाला आहे. लोकप्रतिनिधी तथा प्रशासनाने याकडे लक्ष घालून दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.
चिंचोली लिंबाजी मंडळात गेल्या महिन्याभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. तर या मंडळात तब्बल पाच वेळा अतिवृष्टी झाली. ३१ ऑगस्ट रोजी पूर्णा नदीला आलेल्या महापुरात नेवपूर येथील पूर्णा नदीवरील फरशी पूल पूर्णपणे वाहून गेला आहे. यामुळे नेवपूर-घाटशेंद्रा या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. तेव्हापासून या भागातील नागरिक पर्यायी मार्ग म्हणून वाकी फाटा येथील मार्गावरून जात होते. परंतु मंगळवारी या भागात पुन्हा अतिवृष्टी झाली. पूर्णा नदीला आलेल्या पुरात वाकी येथील नळकांडी पुलाचा दोन्ही बाजूचा भराव वाहून गेल्याने त्याला मोठे भगदाड पडले आहे. पर्यायी मार्गदेखील वाहतुकीस बंद झाल्याने नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.
----
वाकी येथील पुलाला मोठे भगदाड पडल्याने गावात येणारी जड वाहने बंद झाली आहेत. त्यामुळे वाकीसह नेवपूर, रेउळगाव, तळणेर, घाटशेंद्रा येथील ग्रामस्थांना आता बस प्रवासापासून वंचित राहावे लागत आहे. मुक्कामी येणाऱ्या सुमारे पाच बस बंद झाल्याने नागरिकांची गैरयोय होऊ लागली आहे. शेतकऱ्यांना शेतशिवारात जाण्यासाठी पाच-सहा किलोमीटरचा लांबचा फेरा मारून ये-जा करावी लागते.
---------
वाकी (ता.कन्नड) येथील पूर्णा नदीवरील नळकांडी पुलाला मोठे भगदाड पडल्याने हा मार्ग अवजड वाहनांसाठी पूर्णपणे बंद झाला आहे.
230921\20210923_121257.jpg
वाकी (ता.कन्नड) येथील पूर्णा नदीवरील नळकांडी पुलाला मोठे भगदाड पडल्याने हा मार्ग अवजड वाहनांसाठी पूर्णपणे बंद झाला आहे....छाया प्रशांत सोळुंके