कामगारांच्या अत्यावश्यक सुरक्षा कीट वाटपात घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 03:43 PM2019-09-14T15:43:17+5:302019-09-14T15:45:53+5:30
१२०० ते १६०० रुपये घेऊन कीट वाटप होत असल्याचा आरोप उपस्थित मजुरांनी केली.
औरंगाबाद : राज्य शासनाच्या कामगार विभागाकडून बांधकाम व्यावसायिकांकडे काम करणाऱ्या कामगारांसाठी मोफत देण्यात येणाऱ्या अत्यावश्यक आणि सुरक्षा कीट वाटपावरून शुक्रवारी गदारोळ झाला. या कीट वाटपात मोठा घोळ असून, दलालांचे मोठे रॅकेट यामध्ये सक्रिय असल्याचा आरोप कामगारांनी केला.
जालना रोडवरील कैलाश आर्केडच्या तळमजल्यावरील गोदामात कामगारांना वाटप करण्यााठी कीट आल्या आहेत. इंडो प्रा.लि. (मुंबई) या एजन्सीच्या माध्यमातून सदरील कीट वाटप सुरू होते. सुरक्षा आणि अत्यावश्यक अशा दोन्ही कीट सोबत देण्यात याव्यात, अशी मागणी करीत कामगारांनी एजन्सीच्या प्रतिनिधींना गराडा घालून गदारोळ सुरू केला. हा सगळा प्रकार घडत असताना कामगार उपायुक्तालयाचा एकही अधिकारी घटनास्थळी पोहोचला नाही. दरम्यान, भाजप कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय केणेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सदरील प्रकार समजून घेतल्यानंतर याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक केंद्रे यांच्याकडे तक्रार केली. दलालांचे रॅकेट कसे चालते, महिलांकडून १२०० ते १६०० रुपये घेऊन कीट वाटप होत असल्याचा आरोप उपस्थित मजुरांनी केली. यावेळी कामगार आघाडीचे बबनराव पेरे, विशाल गंगावणे आदींची उपस्थिती होती.
अत्यावश्यक कीटमध्ये काय
अत्यावश्यक कीटमध्ये बॅटरी, चटई, मच्छरदाणी, पेटी, वॉटरबॅग, खांद्यावरील बॅग आदी वस्तूंचा समावेश आहे, तर सुरक्षा कीटमध्ये हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, बूट, मोजे आदी वस्तूंचा समावेश आहे. प्रत्येक कीटची सरासरी किंमत ७ हजार रुपये आहे. दोन किटची किंमत १४ हजार रुपये असून, बांधकाम मजूरांना मोफत देण्यात येतात. आजवर जिल्ह्यात १८ हजार कीट वाटप करण्यात आल्या आहेत. २ हजार सुरक्षा कीट वाटप होणे बाकी आहे.
अशी चालते दलाली
कीट वाटपामध्ये दलाली होत आहे. आॅनलाईन अर्ज भरताना काही दलाल स्वत:चा संपर्क क्रमांक टाकतात. कीट आल्याचा मेसेज त्या दलालांच्या मोबाईलवर गेला की, ते लाभार्थ्यांला फोन करून कीट आल्याचे सांगत लाभार्थ्यांकडून ठरलेली रक्कम घेतात. कीट वाटपाचे ठिकाण पैसे मिळाल्यानंतरच ते सांगतात. असा प्रकार काही अशिक्षित मजुरांच्या बाबतीत घडल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला. कामगार उपायुक्त पोळ हे पुण्यातून सगळा कारभार पाहतात, तसेच येथील जबाबदार अधिकारीदेखील याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप आहे.