चार दिवसांचा संसार करून फसविणारी नवरी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 11:03 PM2017-10-30T23:03:55+5:302017-10-30T23:04:07+5:30
लग्नानंतर चारच दिवसांनी माहेरी जाते म्हणून गेलेली नवरी शोधाशोध करुनही मिळाली नाही. त्यामुळे पोलिसात तक्रार दिल्यानंतर या नवरीला व तिच्या सहका-याला पेठबीड पोलिसांनी ताब्यात घेतले
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : लग्नानंतर चारच दिवसांनी माहेरी जाते म्हणून गेलेली नवरी शोधाशोध करुनही मिळाली नाही. त्यामुळे पोलिसात तक्रार दिल्यानंतर या नवरीला व तिच्या सहका-याला पेठबीड पोलिसांनी ताब्यात घेतले. वधू-वर सूचक मंडळाच्या माध्यमातून लग्न जुळवून नंतर फसवणूक करणारे रॅकेट या प्रकरणामुळे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
शिरुर कासार येथील लक्ष्मण विठ्ठल गाडेकर यांनी जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यातील कंडारी येथील वधू-वर सूचक मंडळाचे कासाजी यमाजी खाडे यांच्याकडे वधू संशोधनासाठी नोंद केली होती. त्यानुसार खाडे यांनी लक्ष्मण यांना परभणी येथील पूजा नामक मुलीचे स्थळ दाखविले. यावेळी अवधूत कुंडलिक जाधव, उत्तम केशव शिंदे [दोघेही रा. परभणी] यांनी मदत केली. मुलगी पसंत पडल्यानंतर १ डिसेंबर २०१६ रोजी कनकालेश्वर मंदिर परिसरात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न झाले. लग्नानंतर पूजा सासरी गेली. मात्र, चार दिवसांनी माहेरी जाण्याची इच्छा व्यक्त केली. लक्ष्मण तिला जुना पडेगाव रस्ता भागात सोडून आला. मात्र, त्यानंतर पूजाचा फोन स्वीच आॅफ राहिला. लग्नासाठी लक्ष्मणने ३५ हजार रुपयांचे मंगळसूत्र, तसेच कपडे खरेदी केले होते. हे साहित्य घेऊन पूजा पसार झाली. सुरुवातीला लक्ष्मणला पोलिसांनी दाद दिली नाही. त्यामुळे न्यायालयात जावे लागले. २१ एप्रिल रोजी न्यायालयाच्या आदेशानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. अखेर पूजा आणि अवधूत जाधव यांना जमादार खाडे व इतर कर्मचा-यांनी परभणी येथून चौकशीसाठी आणले. त्यानंतर सोमवारी सायंकाळी अटक केली. अधिक तपास जमादार खाडे हे करीत आहेत.