'लाडकी बहीण' योजनेच्या मंजुरीचे आमिष देऊन फसवणूक; पैसे घेणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 07:42 PM2024-07-16T19:42:52+5:302024-07-16T19:43:42+5:30
शासकीय योजनेच्या मंजूरीसाठी दलाली करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मुख्यमंत्र्याच्या घोषणेनंतर राज्यातील पहिला गुन्हा दाखल
- श्रीकांत पोफळे
करमाड: संजय गांधी, श्रावणबाळ, लाडकी बहिण अशा शासनाच्या विविध योजनेचा लाभ मंजूर करून देण्यासाठी निराधार, गरीब महिलांकडून पैसे उकळणाऱ्या वंदना म्हस्के ( रा. हातमाळी ता. जि. छत्रपती संभाजीनगर) या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील महिलांनी गाऱ्हाणे मांडल्यानंतर तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी स्वतः महिलांचे जवाब घेत करमाड पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. प्रशासनाच्या वतीने तलाठी विशाल मगरे यांनी फिर्यादी दिली.
मागील काही महिन्यांपासून शासनाच्यावतीने आवश्यक प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे लाभार्थ्यांचे अनुदान बंद करण्यात आले. हे अनुदान पुन्हा चालू करण्यासाठी तालुक्यातील गोरगरीब महिला गाव पातळीवरील पुढाऱ्यांचे उंबरठे झिजवत आहेत. दरम्यान, शासनाने लाडकी बहीण योजना जाहीर केली. यामुळे बंद अनुदान मंजूर करून देते, लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळून देते असे सांगून वंदना मस्केने महिलांकडून पैसे उकळले. मात्र,पैसे देऊनही लाभ मिळत नसल्याने महिलांनी विचारणा करताच म्हस्केने त्यांना धमकी दिली. त्यानंतर करमाड पंचक्रोशीतील महिलांनी तहसीलदारांकडे धाव घेत आपले गाऱ्हाणे मांडले.
तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी देखल घेत तक्रारदार महिलांचे जबाब नोंदवून घेतले. लाडकी बहीण योजनेत कुणी दलाली करत असेल तर त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा असे आदेश मुख्यमंत्री यांनी विधानभवनात दिले होते. या आदेशपत्राचा उल्लेख करत तहसीलदार मुंडलोड यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. प्रशासनाच्यावतीने तलाठी विशाल मगरे यांनी फिर्याद दिली. करमाड पोलीस ठाण्याचे पोनी प्रताप नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोऊनी रामेश्वर ढाकणे पुढील तपास करत आहेत.
आरोपी वंदना मस्के यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हाध्यक्ष असल्याचे लेटरहेड वापरून योजना मंजूर करण्यासाठी उपोषणाचा इशारा दिलेला आहे. शिवाय याच लेटरहेडवर विविध शासकीय कार्यालयात आरटीआयचा वापर करत माहिती मागवत असत. यासंदर्भात प्रहारच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.
लाडकी बहीण योजनेत दलाली करण्यावर राज्यातील पहिला गुन्हा
अधिकाऱ्यांच्या नावे पैसे घेणाऱ्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल. सरकार व प्रशासनाच्या वतीने मंजूरीसाठी कुठेही पैसे लागणार नाही. अशावेळी लाभार्थ्यांनी पैसे देणेच मुळात चुकीचे आहे
- रमेश मुंडलोड, तहसीलदार, छत्रपती संभाजीनगर