छत्रपती संभाजीनगरात कचरा संकलनात घोळ, सीसीटीव्हीने केला उघड; 'रेड्डी'ला २९ लाख दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 11:56 IST2024-11-30T11:56:00+5:302024-11-30T11:56:28+5:30
कचरा संकलनात अपयश; कंपनीला शंभर टक्के डोअर टू डोअर कलेक्शन करणे आजपर्यंत जमले नाही.

छत्रपती संभाजीनगरात कचरा संकलनात घोळ, सीसीटीव्हीने केला उघड; 'रेड्डी'ला २९ लाख दंड
छत्रपती संभाजीनगर : शहरातील कचरा संकलनाचे काम हैदराबाद येथील रेड्डी कंपनी मागील ७ वर्षांपासून करीत आहे. कंपनीला शंभर टक्के डोअर टू डोअर कलेक्शन करणे आजपर्यंत जमले नाही. शहरात स्मार्ट सिटीचे ७५० कॅमेरे लावले आहेत. या कॅमेऱ्यात रेड्डी कंपनीच्या रिक्षा विविध वसाहतींमध्ये दररोज जातात का? याची तपासणी केली. त्यामध्ये एक दिवसाआड कंपनीच्या घंटागाड्या येत असल्याचे उघड झाले. त्यामुळे कंपनीला २९ लाख रुपये दंड लावण्याचा निर्णय प्रशासक यांनी घेतला.
प्रशासकांना शुक्रवारी रेड्डी कंपनीच्या भाेंगळ कारभाराचा अहवाल सादर करण्यात आला. मागील सहा वर्षांपासून कंपनी दररोज ४५० मेट्रिक टन कचरा उचलत असल्याचे दाखवत आहे. धक्कादायक बाब म्हणजे कचऱ्याचे वजन दररोज एकसारखेच आहे. कचरा कधी कमी तर कधी जास्त जमा होऊ शकतो. दिवाळीतही कचरा तेवढाच जमा होतो. त्यामुळे प्रशासकांनी रेड्डी कंपनीच्या कामाचे अवलोकन करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये अनेक बाबी आश्चर्यचकित करणाऱ्या होत्या. शहराला किमान १ हजार घंटागाड्या अपेक्षित असताना कंपनी फक्त ३०० घंटागाड्यांवर काम चालवत आहे. सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत कंपनीने घंटागाड्यांचे प्रमाण वाढविले पाहिजे. वारंवार सूचना देऊनही कंपनी गाड्यांची संख्या वाढवायला तयार नाही. घंटागाडी येत नसल्याने अनेक नागरिक कचरा विविध चौकात आणून टाकतात. त्यामुळे शहर अस्वच्छ दिसते. विशेष बाब म्हणजे कंपनीने १ टन कचरा जमा केल्यास १८६० रुपये मनपा देते. दरमहा कंपनीचे बिल ३ कोटीपर्यंत जाते. पाण्यासारखा पैसा खर्च करूनही शहर अस्वच्छ दिसून येते. याला फक्त रेड्डी कंपनीच जबाबदार असल्याचे समोर आले. त्यामुळे शुक्रवारी प्रशासकांनी कंपनीला २९ लाख रुपये दंड लावण्याचे आदेश दिले.
कंपनीला मुदतवाढ नाही
मागील ७ वर्षात कंपनीच्या कामात अजिबात सुधारणा नाही. त्यामुळे कंपनीचे कंत्राट भविष्यात वाढवून न देण्याचा विचार प्रशासन करीत आहे. कंपनीला वाहने उभी करण्यासाठी ८ ते १० ठिकाणी मोफत भूखंड उपलब्ध करून दिले. मनपाच्या मालकीच्या ५० घंटागाड्याही कंपनीला मोफत देण्यात आल्या. त्यानंतरही कंपनी कामात सुधारणा करायला तयार नाही.