जलयुक्त शिवार योजनेत अपहार; बनावट देयके दाखल केलेल्या वनपालावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 06:26 PM2022-04-06T18:26:57+5:302022-04-06T18:27:45+5:30
शासनाच्या आदेशानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या कामांची चौकशी केली जात आहे.
औरंगाबाद : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सलग समतल चर खोदण्याचे काम केल्याची बनावट देयके दाखल करून अंजनडोह (ता. औरंगाबाद) येथील वनपाल तथा वन व्यवस्थापन समितीच्या सचिवाने २ लाख ४७ हजार ३४४ रुपयांचा अपहार केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या चौकशीत समोर आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी वनपालाविरोधात करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला.
गणेश राधाकिसन पचलोरे, असे गुन्हा नोंद झालेल्या वनपालाचे नाव आहे. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या. शासनाच्या आदेशानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या कामांची चौकशी केली जात आहे. वन विभागाच्या वतीने अंजनडोह येथे १८ सप्टेंबर २०१६ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत सलग समतल चर खोदण्याची कामे करण्यात आल्याचे दाखवून निधी खर्चला गेला.
एसीबीचे उपअधीक्षक रूपचंद मधुकर वाघमारे या कामाची चौकशी करीत होते. तेव्हा गणेश पचलोरे हा अंजनडोह येथे वनपाल तथा संयुक्त वन व्यवस्थापन समितीचा सचिव म्हणून कार्यरत होता. त्याने अंजनडोह येथे २०१६-१७ या कालावधीत चर खोदल्याचे दाखवून बनावट प्रमाणके (जनरल व्हाउचर) तयार केली. ती खरे असल्याचे भासवून त्याने बँकेतून २ लाख ४७ हजार ३४४ रुपये काढून अपहार केल्याचे चौकशीत समोर आले. पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक वाघमारे यांनी ५ एप्रिल रोजी पचलोरेविरोधात करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला.