महाविकास आघाडी सरकारकडून ओबीसींची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:05 AM2021-09-18T04:05:12+5:302021-09-18T04:05:12+5:30
औरंगाबाद : ओबीसींना अंधारात ठेवून निवडणूक जाहीर करून महाविकास आघाडी सरकारने ओबीसीची फसवणूक केली आहे. त्यामुळे ‘ऊठ ओबीसी जागा ...
औरंगाबाद : ओबीसींना अंधारात ठेवून निवडणूक जाहीर करून महाविकास आघाडी सरकारने ओबीसीची फसवणूक केली आहे. त्यामुळे ‘ऊठ ओबीसी जागा हो‘, अशी हाक देत वंचित बहुजन आघाडीने जनजागृती सुरू केली आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत या पक्षाचे राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी दिली.
राज्य व केंद्र सरकार ओबीसींच्या आरक्षणासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. ५० टक्क्यांच्या अधिन राहून ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेश काढू, असे महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले होते. आता पाच जिल्ह्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्याची शक्यता नाही. ओबीसींची मते चालतात; परंतु त्यांचे हक्क त्यांना दिले जात नाहीत. त्यामुळे जनरेटा तयार करण्यासाठी बहुजन वंचित आघाडीने जिल्हास्तरावर जनजागृती सुरू केली आहे. पुढील आंदोलनाची दिशा लवकरच जाहीर केली जाईल, असे मोकळे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
या वेळी पूर्व अध्यक्ष प्रभाकर बकले, पश्चिम अध्यक्ष योगेश बन, महिला आघाडी लता बमणे, महासचिव रविकुमार तायडे, पंकज बनसोडे, भाऊराव गवई आदींची उपस्थिती होती.