बिल्डरचा भागीदार असल्याची बतावणी करून गंडविणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 06:33 PM2019-03-23T18:33:56+5:302019-03-23T18:35:30+5:30
पुंडलिकनगर पोलिसांनी आरोपीला उच्चभ्रू वसाहतीतून अटक केली.
औरंगाबाद: बिल्डरचा भागीदार असल्याची बतावणी करून इमारतीमधील फ्लॅटची परस्पर इसारपावती करून देत ३ लाख ७१ हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका जणाला पुंडलिकनगर पोलिसांनी उच्चभ्रू वसाहतीतून अटक केली.
गोपाल माहेश्वरी (रा. बदलापुर,जि. ठाणे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपी हा राज्यातील विविध शहरातील उच्चभ्रू वसाहतीत राहून तेथील नवीन बांधकाम होत असलेल्या अपार्टमेंट आणि बिल्डरची माहिती मिळवित. यानंतर तो फ्लॅट खरेदी करण्यास उत्सूक असलेल्या लोकांशी संपर्क साधून बिल्डरचा भागीदार असल्याचे सांगून फसवणुक करीत असे.
पिसादेवी रस्त्यावरील अंबादास त्र्यंबकराव राकडे हे खाजगी नोकरी करतात. त्यांना आणि त्यांची बहिण सविता गावंडे, भावजी भगवान दसपूते यांना आरोपी गोपाल माहेश्वरीने ब्रिजवाडी येथील रोहन रेसिडेन्सी या अपार्टमेंट बांधणाऱ्या बिल्डरचा तो भागीदार असल्याचे सांगून त्यातील फ्लॅट क्रमांक २ विक्री करीत असल्याचे कागदपत्रे त्याने तयार केले. त्याआधारे त्याने राकडे यांच्याकडून इसारपावती म्हणून ३ लाख ७१ हजार रुपये घेऊन फसवणुक केली होती.
याप्रकरणी राकडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून १८ मार्च रोजी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा नोंद झाला होता. पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, कर्मचारी रमेश सांगळे, मच्छिंद्र शेळके,बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, रवी जाधव जालिंदर मांटे, विलास डोईफोडे आणि महिला कर्मचारी नंद गरड यांनी आरोपी माहेश्वरीला अटक केली. त्याने यापूर्वीही वाळूज परिसरातील मोरे चौकात कार्यालय थाटून तेथील गरीब लोकांना फसविल्याची प्राथमिक माहिती असल्याचे सहायक निरीक्षक सोनवणे यांनी सांगितले.