शहर नामांतराचा प्रश्न फसवा, विकासाचे मुद्दे हवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:05 AM2021-01-03T04:05:06+5:302021-01-03T04:05:06+5:30
औरंगाबाद : शहर नामांतराचा प्रश्न फसवा आहे. विकासाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. विकासाच्या व मूळ प्रश्नांची चर्चा होऊ नये यासाठी ...
औरंगाबाद : शहर नामांतराचा प्रश्न फसवा आहे. विकासाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. विकासाच्या व मूळ प्रश्नांची चर्चा होऊ नये यासाठी मनपा निवडणुकीच्या तोंडावर काही पक्ष, असे प्रश्न उकरून काढतात. मतदारांनी अशा पक्षांना बाजूला सारावे, असे आवाहन आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रंगा राचुरे यांनी शनिवारी येथील पत्रपरिषदेत केले.
यावेळी त्यांनी जाहीर करून टाकले की, आम आदमी पार्टी औरंगाबाद महापालिकेच्या सर्वच्या सर्व जागा लढविणार आहे. उद्यापासून प्रत्येक वाॅर्डात इच्छुक उमेदवार व त्याच्याबरोबर पाच कार्यकर्ते फिरून नागरी समस्यांचा आढावा घेतील. १५ दिवसांत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
भावनिक प्रश्नांना साद घालत राजकारण करण्याची गरज नाही. शहराचे मूलभूत प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या भावनिक प्रश्नांभोवती फिरत राहिल्याने मूळ प्रश्नांची चर्चाच होत नाही, अशी खंतही राचुरे यांनी व्यक्त केली. आम आदमी पार्टीचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा निवडणूक काळात दौरा आयोजित करण्यात येईल, अशीही माहिती त्यांनी दिली. घर तेथे नळ, घर तेथे ड्रेनेज, शहराला पुरेसे पाणी व योग्य प्रमाणातील पाणी बिल, वाॅर्ड तेथे क्लिनिक, गुंठेवारीतील क्षेत्रधारकांना पीआर कार्ड हे मुद्दे घेऊन आम आदमी पार्टी निवडणूक लढवेल, असे त्यांनी जाहीर केले.
पत्रपरिषदेस मराठवाडा अध्यक्ष डॉ. सुभाष माने, संघटनमंत्री सुग्रीव मुंडे, इसाक अंडेवाला, अशीर जयहिंद, वैजनाथ राठोड, सतीश संचेती, मंगेश गायकवाड, दत्तू पवार आदींची उपस्थिती होती.