जिओची डीलरशिप देण्याच्या आमिषाने १ कोटी १० लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:02 AM2021-01-09T04:02:21+5:302021-01-09T04:02:21+5:30
औरंगाबाद : रिलायन्स जिओ कंपनीची अधिकृत डीलरशिप देण्याचे आमिष दाखवून शहरातील एक जणाला १ कोटी १० लाख रुपयांचा ...
औरंगाबाद : रिलायन्स जिओ कंपनीची अधिकृत डीलरशिप देण्याचे आमिष दाखवून शहरातील एक जणाला १ कोटी १० लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या चार तरुणांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. आरोपींना न्यायालयाने १२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात आणखी सहा ते सात जणांची फसवणूक झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
शेख इर्शाद शेख फारुख (रा. सईदा कॉलनी), मोहसीन खान गुलाब खान (रा. एन-७ सिडको), तौसीफ खान युसूफ खान (रा. रशीदपुरा) आणि शेख मोहम्मद अमीर मोहम्मद नईमउद्दीन (रा. रहेमानिया कॉलनी), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींचा पाचवा साथीदार फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. रहेमानिया कॉलनी येथील शेख मुबारक शेख हबीब अलजबरी यांची घराजवळ जाणाऱ्या नातेवाईकामार्फत आरोपी शेख इर्शाद याच्याशी ओळख झाली होती. तेव्हा इर्शाद हा रिलायन्स कंपनीत नोकरी करत होता. तक्रारदार आणि शहरातील अन्य काही लोकांना त्याने रिलायन्स जिओ कंपनीची डीलरशिप मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्याच्यावर विश्वास ठेवून शेख मुबारक यांनी त्याला टप्प्याटप्प्याने १ कोटी १० लाख रुपये रोखीने दिले.
====================
चौकट
रिलायन्सचे अधिकारी म्हणून मित्रांना केले उभे
इर्शाद याने त्याच्या वेगवेगळ्या चार मित्रांना पुणे आणि मुंबई कार्यालयातील रिलायन्स कंपनीत कार्यरत खऱ्या अधिकाऱ्यांच्या नावाने येथे उभे केले.
===============
डीलरशिपचे बनावट पत्र दिले
तक्रारदार आणि अन्य लोकांना त्यानी जिओचे डीलर म्हणून नियुक्त केल्याचे बनावट पत्र दिले. यानंतर ते गायब झाले. संशय आल्यावर तक्रारदारांनी रिलायन्स कंपनीत शहानिशा केली असता आरोपींचा खोटेपणा समोर आला. यानंतर त्यांनी पोलीस आयुक्तांकडे याविषयी तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक डी.एस. शिनगारे यांनी याप्रकरणी गुन्हा नोंदविला. फौजदार दीपक लंके, हवालदार सुनील फेपाळे, नितेश घोडके यांनी आरोपीना अटक केली.