दुप्पट परताव्याचे आमिष देऊन ७ जणांना १५ लाखाचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 07:07 PM2020-12-16T19:07:24+5:302020-12-16T19:08:58+5:30

तक्रारदार आणि गुंतवणूकदारानी जुलै महिन्यात ठोंबरेचे गाव गाठले

fraud of Rs 15 lakh to 7 people for double return | दुप्पट परताव्याचे आमिष देऊन ७ जणांना १५ लाखाचा गंडा

दुप्पट परताव्याचे आमिष देऊन ७ जणांना १५ लाखाचा गंडा

googlenewsNext
ठळक मुद्देआरोपीने गुंतवणूकदाराना धमकावले 

औरंगाबाद: पिग्मी व्यवसायात दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून सैनिकांच्या पत्नीसह ७ जणाना १४ लाख ९४ हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या कुटुंबाविरुध्द छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संजय बाळासाहेब ठोंबरे, संजयची पत्नी इंदूबाई ठोंबरे, मुलगा सचिन ठोंबरे आणि नितीन ठोंबरे (सर्व. रा. माजी सैनिक कॉलनी, पडेगांव, मूळ रा. दिदृड, ता. माजलगाव, जि. बीड) अशी आरोपींची नावे आहेत. 

प्राप्त माहितीनुसार तक्रारदार रेखा भगवान गायकवाड (रा. माजी सैनिक कॉलनी , पडेगांव) यांचे पती केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत आहेत. आरोपी आणि तक्रारदार यांच्यात जुनी ओळख आहेत. फेब्रुवारी २०१८ मध्ये आरोपी पती-पत्नी त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी त्यांचा मुलगा पिग्मी व्यवसाय करतो. त्याच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास दोन वर्षात दुप्पट परतावा मिळेल असे सांगितले. ही बाब त्यांनी पटवून सांगितली आणि पैशाची हमी दिली. यामुळे तक्रारदार यांनी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली. त्यांनी २ लाख १६ हजार रुपये गुंतवणूक केले. 

त्यांच्याप्रमाणेच शुभम शंकर घोडके यांनी ३ लाख ६ हजार रुपये, नंदा संभाजी गजले यांनी २लाख १६ हजार रुपये, मथुरा भिका घुगे यांनी २ लाख १६ हजार, हमिदा आमीर खान पठाण (मनिषा कॉलनी वाळूज) यांनी २ लाख १६ हजार ,हरिदास नामदेव पवार (फिरदोस गार्डन ) यांनी २ लाख १६ हजार रुपये आणि लता वसंत गवंदे यांनी १ लाख ८ हजार रुपये गुंतवणूक केली. तक्रारदार आणि अन्य गुंतवणूकदारांची मुदत मार्च महिन्यात समाप्त झाली यामुळे त्यांनी ठोंबरे कुटुंबाकडे दुप्पट रक्कमेची मागणी केली. तेव्हा तक्रारदार यांनी त्यांच्या कुटुंबाला कोरोना झाल्याचे कारण सांगून पैसे नंतर देतो असे सांगितले. यानंतर ते गावी दिदृड ला निघून गेले होते. 

आरोपीने गुंतवणूकदाराना धमकावले 
यामुळे तक्रारदार आणि गुंतवणूकदारानी जुलै महिन्यात ठोंबरेचे गाव गाठले असता आरोपी संजय हा घरी नव्हता. आरोपी सचिन आणि नितीन यांनी त्यानाच माझ्या वडिलांचे तुमच्याकडे पैसे आहे असा कांगावा केला. आणि तुम्ही येथून निघून जा असे धमकावले. यानंतर तक्रारदार आणि अन्य गुंतवणूकदारानी आर्थिक गुन्हे शाखा गाठून आरोपीविरुद्ध तक्रार नोंदविली. या अर्जाची सखोल चौकशी करून छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या गुंह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पी. एस. भागिले तपास करीत आहेत.

Web Title: fraud of Rs 15 lakh to 7 people for double return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.