कापड दुकानाच्या फ्रेन्चायसी व्यवहारात व्यापाऱ्याची ५९ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:02 AM2021-06-16T04:02:26+5:302021-06-16T04:02:26+5:30
औरंगाबाद: ४५ लाख रुपये डिपॉझिट घेऊन कापड दुकानाचे आऊटलेट (फ्रेन्चायझी) देताना केलेल्या करारानुसार नफा आणि परतावा न देता ...
औरंगाबाद: ४५ लाख रुपये डिपॉझिट घेऊन कापड दुकानाचे आऊटलेट (फ्रेन्चायझी) देताना केलेल्या करारानुसार नफा आणि परतावा न देता कंपनीने शहरातील व्यापाऱ्याची ५९ लाख २३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले. याप्रकरणी ए.एन रिल्स व्हेंचर्सचे भागीदार आणि आसिफ शेख, नितीन खन्ना आणि संचालक तसेच कॉटन वर्ल्ड कंपनी, लेखराज कार्प प्रा. लि.चे संचालक संजीव लेखराज, लवीन लेखराज आणि इतरांविरुद्ध सोमवारी उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार पंकज मदनलाल अग्रवाल (रा. गारखेडा परिसर) २०१८ साली त्यांची ओळख आरोपी आसिफ शेख आणि नितीन खन्नासोबत झाली होती. तेव्हा त्यांनी सांगितले की, ए. एन रिल्स व्हेंचर्सकडून कॉटन वर्ल्डची फ्रेन्चायझी घ्या, तुम्ही गुंतवणूक करा, प्रत्येक महिन्याला ९० हजार रुपये अथवा विक्री होणाऱ्या मालावर १६ टक्के परतावा यापैकी जी रक्कम जास्त असेल ती तुम्हाला मिळेल. त्यांच्यावर विश्वास ठेवून तक्रारदार यांनी आरोपींच्या कंपनीची प्रोझोन मॉल आणि निराला बाजार, खराडी पुणे अशा तीन ठिकाणी फ्रेन्चायझी घेतल्या. याविषयी करारनामा करण्यात आला. मार्च ते जून २०१९ पर्यंत प्रत्येक महिन्याचे कमिशन म्हणून तक्रारदार यांना दिले. व्यवसाय सुरळीत सुरू असताना २९ जून २०१९ रोजी अचानक फ्रेन्चायसी रद्द करण्यात आल्याचा ई मेल तक्रारदार यांना पाठविण्यात आला. हिशेबानुसार रक्कम परत देऊ, असे त्यांना सांगण्यात आले. यानंतर तक्रारदार यांनी वारंवार मागणी केल्यावरही आरोपींनी डिपॉझिट रक्कम ४५ लाख रुपये आणि कमिशनची रक्कम असे एकूण ५९ लाख २३ हजार रुपये परत केले नाही. शेवटी त्यांनी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांची भेट घेऊन तक्रार अर्ज केला. आर्थिक गुन्हे शाखेने या अर्जाची चौकशी करून उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा नोंदविला. पोलीस निरीक्षक दादाराव सिनगारे तपास करीत आहेत.