भरघोस परताव्याचे आमिष दाखवून मैत्रिणीच्या पतीची ६९ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 07:13 PM2020-08-14T19:13:21+5:302020-08-14T19:15:58+5:30

व्यवसायात पैसे गुंतविल्यास प्रति लाख ५ हजार ते १२ हजार ५०० रुपये नफा मिळेल, असे आमिष दिले

Fraud of Rs 69 lakh with friend's husband for lucrative return | भरघोस परताव्याचे आमिष दाखवून मैत्रिणीच्या पतीची ६९ लाखांची फसवणूक

भरघोस परताव्याचे आमिष दाखवून मैत्रिणीच्या पतीची ६९ लाखांची फसवणूक

googlenewsNext
ठळक मुद्देसंशयित आरोपी दाम्पत्य फरार स्क्रॅप व्यवसायात गुंतवणूक करायला लावली 

औरंगाबाद : स्क्रॅप व्यवसायात गुंतवणूक केल्यास १ लाखामागे दरमहा ५ ते १२ हजार ५०० रुपये असे भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून एका दाम्पत्याने मैत्रिणीच्या पतीला तब्बल ६९ लाखांचा गंडा घातला. यानंतर हे दाम्पत्य हैदराबादला पळून गेले. या जोडीने अशाच प्रकारे बीड बायपासवर कार्यालय थाटून अनेकांना गंडविल्याचे समोर आले. आयेशा सय्यद मोहम्मद मुर्तुजाअली आणि सय्यद मुर्तुजाअली सय्यद मोहम्मद मुस्तफाअली असे फसवणूक केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.

तक्रारदार अब्दुल कदीर अब्दुल माजीद शेख हे खाजगी नोकरी करतात, तर त्यांची पत्नी शिरीन शेख या जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आहेत. आयेशा ही शिरीन यांची जुनी मैत्रीण आहे. तिच्यामुळे सय्यद मुर्तुजासोबत २०१८ मध्ये ओळख झाली. तेव्हा त्याने त्याचा स्क्रॅपचा व्यवसाय असल्याचे आणि यात खूप नफा असल्याचे तक्रारदारांना सांगितले. दरम्यान, सप्टेंबर २०१८ मध्ये त्याने त्याच्या व्यवसायात पैसे गुंतविल्यास प्रति लाख ५ हजार ते १२ हजार ५०० रुपये नफा मिळेल, असे सांगितले.

त्याच्यावर विश्वास ठेवून तक्रारदार दाम्पत्याने सुरुवातीला ५ लाख रुपये दिले. या रकमेवर मुर्तुजाने त्यांना दरमहा परतावा देऊन विश्वास संपादन केला. दरम्यान, जुलै २०१९ मध्ये त्याने अब्दुल कदीर यांच्या घरी जाऊन त्याच्याकडे मोठे काम असल्याने २५ लाखांची आवश्यकता असल्याचे त्याने सांगितले. एवढी रक्कम नसल्यास कर्ज काढा आणि पैसे द्या तुम्हाला १२ हजार ५०० रुपयांप्रमाणे नफा देतो. वर्षभरापासून त्याने नियमित परतावा दिल्याने तक्रारदार यांनी डॉक्टर पत्नीच्या नावे बजाज फायनान्सकडून १५ लाख रुपये आणि अन्य एका बँकेकडून ९ लाख ५० हजार रुपये आणि सोने तारण ठेवून एक लाख कर्ज घेऊन त्याला पैसे दिले. २३ आॅगस्ट रोजी ६ लाख ५० हजार दिले. आॅनलाईन बँकिंगद्वारे विविध बँकांडून त्याला त्यांनी ४३ लाख रुपये, तर रोखीने २६ लाख ३५ हजार ५०० रुपये असे एकूण ६९ लाख ३५ हजार ५०० रुपये दिले. डिसेंबर २०१९ मध्ये तो सर्व रक्कम तक्रारदार यांना परत करणार होता. मात्र, वेगवेगळी कारणे सांगून आयेशा आणि मुर्तुजाने पैसे देण्यास टाळाटाळ केली.

दाम्पत्य अचानक हैदराबादला गेले पळून
तक्रारदारांनी  त्याची अधिक माहिती घेतली असता  आरोपीने बायपासवरील महानुभाव चौकाजवळ वेलकम ग्रुप नावाने कार्यालय थाटून शहरातील अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे त्यांना समजले. आरोपी दाम्पत्य अचानक बायपास परिसरातील अथर्व हाऊसिंग सोसायटीतील घर सोडून हैदराबादला पळून गेल्याचे तक्रारदारांना समजले. यामुळे त्यांनी त्याचे मित्र आणि नातेवाईक यांच्याकडून त्याचा पत्ता मिळविला आणि हैदराबाद गाठले. तेव्हा तेथे तो त्यांना भेटला नाही. त्याचा मेहुणा आणि सासरे यांनी मुर्तुजा तुम्हाला लॉकडाऊननंतर पैसे देईल, असे सांगितले. लॉकडाऊन समाप्त झाल्यानंतरही आरोपींनी पैसे न दिल्याने शेवटी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदविली. याविषयी गुरुवारी रात्री जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लंके यांनी तपास सुरू केला. 

Web Title: Fraud of Rs 69 lakh with friend's husband for lucrative return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.