सानिया डिस्ट्रिब्युटर्सने सैनिकालाही फसविले; कंपनीची योजना राबवितानाही ग्राहकांसोबत फसवेगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 12:54 PM2018-08-03T12:54:21+5:302018-08-03T12:57:02+5:30
सानिया शोरूममध्ये तर कंपनीची योजना राबविताना ग्राहकांची फसवेगिरी केल्याची तक्रार आहे. देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकालाही याचा फटका बसला. यामुळे संतापलेल्या जवानाने वितरकाविरुद्ध तक्रार दाखल केली.
औरंगाबाद : शहरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे विक्रेते सानिया डिस्ट्रिब्युटर्स व अरुण इलेक्ट्रॉनिक्सविरुद्ध ग्राहकांच्या तक्रारी समोर येत आहेत. सानिया शोरूममध्ये तर कंपनीची योजना राबविताना ग्राहकांची फसवेगिरी केल्याची तक्रार आहे. देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकालाही याचा फटका बसला. यामुळे संतापलेल्या जवानाने वितरकाविरुद्ध तक्रार दाखल केली.
‘इलेक्ट्रॉनिक वस्तू ‘आॅनलाईन’वर प्रचंड स्वस्त; ग्राहकही आकर्षित’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने गुरुवारी (दि.२) बातमी प्रसिद्ध केली. यानंतर सानिया डिस्ट्रिब्युटर्स व अरुण इलेक्ट्रॉनिक्स या दोन शोरूमच्या विरोधात विक्री व विक्रीपश्चात सेवांविषयी तक्रारी देणाऱ्या ग्राहकांचे अनेक फोन ‘लोकमत कार्यालया’स आले. सानिया डिस्ट्रिब्युटर्सने तर एका सैनिकालाही फसविल्याची आॅनलाईन तक्रार आमच्या हाती लागली.
लष्करातील जवान संजय वाघ यांनी थेट सानियाविरुद्ध नॅशनल कंझ्युमर कम्प्लेंट फोरम यांच्या कम्प्लेंट बोर्ड या संकेतस्थळावर तक्रार (नं. २१०७२००९०) केली आहे. त्यांनी तक्रारीत म्हटले की, ते १९९९ पासून एलजी कंपनीचे ग्राहक आहेत. त्यांनी प्रथम फ्रीज, त्यानंतर २००० मध्ये टीव्ही व कॉम्प्युटर मॉनिटर खरेदी केले होते. २००४ मध्ये गणेशोत्सवात एलजीची ‘मोदक फोडा बक्षीस जिंका’ योजना जाहीर झाली. तेव्हा वाघ यांनी सानिया शोरूममधून वॉशिंग मशीन एलजी ६ किलो, डब्ल्यूपी.९०३९ व मोबाईल हॅण्डसेट जे-१५०० खरेदी केला होता. दोन वस्तू खरेदी केल्या, तर दोन मोदक भेटणे अपेक्षित होते.
मात्र, प्रत्यक्षात एकच मोदक त्यांना देण्यात आला. वाघ यांनी तक्रारीत पुढे म्हटले आहे की, मी सीमेवर दुर्गम भागात ड्यूटी करीत असल्याने माझे सतत औरंगाबादला येणे जमत नाही. माझा मुलगा निखिल व मित्र दोघांनी ते मोदक फोडले. त्यातून ‘मिल्टॉन कंपनीचे ग्लासवेअर’ बक्षीस लागले. १,१५० रुपयांचे हे बक्षीस होते. मुलाने घरी बक्षीस नेल्यावर पाहिले, तर त्यावर अवघी २१० रुपये एवढीच किंमत होती. माझी फसवणूक झाली असून, बक्षिसाची उर्वरित रक्कम मला मिळावी, असा दावाही त्यांनी केला होता.
आणखी एका ग्राहकाने वेगळीच तक्रार केली. त्यांनी सांगितले की, एलजीचे शोरूम असल्याने मी सानियामध्ये गेलो होतो. वॉटर प्युरिफायर दाखविण्यात आले. मोठ्या विश्वासावर मी ते खरेदी केले. १५ हजार रुपयांपर्यंत त्याची किंमत होती; पण नंतर ते वॉटर प्युरिफायर बिघडले. मला विक्रीपश्चात सेवेचा वाईट अनुभव आला. कंपनीच्या कस्टमर केअरचा नंबर देण्यात आला. त्यानंतर त्यावर दुरुस्तीला ४ ते ६ हजार रुपये खर्च आला. अशाच आणखी काही तक्रारी ग्राहकांनी केल्या. या तक्रारींवरून ग्राहकांना योजनेत कसे फसविले जाते व विक्रीपश्चात सेवा देताना कशी वागणूक दिली जाते याची प्रचीती येते.
अरुण इलेक्ट्रॉनिक्सबद्दलही तक्रारी
शहरातील एका ग्राहकाने सांगितले की, जाहिरात पाहून मी अरुण इलेक्ट्रॉनिक्समध्ये विशिष्ट कंपनीच्या कूलर खरेदीसाठी गेलो होतो. मात्र, त्याऐवजी मला दुसऱ्याच कंपनीच्या कूलरची शिफारस करण्यात आली. आदल्या दिवशी एका सेल्समनने त्या कूलरची किंमत १५ हजार सांगितली. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा त्याच शोरूममध्ये गेलो तेव्हा दुसऱ्या सेल्समनने त्याच कूलरची किंमत १६ हजार रुपये दाखविली. एकाच वस्तूची किंमत दोन वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळी सांगण्यात आली.
मल्टिब्रॅण्ड शोरूममध्ये ग्राहकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप आणखी एका ग्राहकाने केला. जाहिरात वाचून मी अरुण इलेक्ट्रॉनिक्सच्या शोरूममध्ये गेलो. तेथे एलजीचा टीव्ही दाखविला; पण लगेच त्यापेक्षा चांगला टीव्ही असल्याचे सांगून दुसऱ्या कंपनीचा टीव्ही दाखविण्यात आला. टीव्ही खरेदी केल्यानंतर विक्रीपश्चात सेवा व्यवस्थित मिळाली नाही. दुरुस्तीसाठी मला अनेक चकरा माराव्या लागल्या.