जावयाचा प्रताप ! सासऱ्याकडून १० लाख उकळून पत्नीला दिले बनावट नियुक्तीपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:19 PM2021-09-15T16:19:02+5:302021-09-15T16:21:08+5:30
crime news Aurangabad : पत्नीला नोकरीला लावण्यासाठी लग्नापूर्वी बोली करून सासऱ्याकडून घेतले पैसे
औरंगाबाद : अभियंता पत्नीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सासऱ्याकडून दहा लाख रुपये उकळणाऱ्या पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध जिन्सी पोलीस ठाण्यात मंगळवारी विवाहितेने तक्रार नोंदविली.
पती राेहित जगन्नाथ पोतराजे, सुमित्रा जगन्नाथ पोतराजे, चंद्रकला छगन पोतराजे आणि राहुल जगन्नाथ पोतराजे (सर्व रा.संग्रामनगर, जालना) अशी आरोपींची नावे आहेत. या घटनेविषयी पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार दिव्या आणि आरोपी राेहितचे लग्न ५ मे रोजी विवाह झाला. तक्रारदार विवाहिता बी.ई. सिव्हिल इंजिनीअर असून, त्या लग्नापूर्वी अंबड (जालना) येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये तासिका तत्त्वावर नोकरी करीत होत्या. आरोपींकडून लग्नाचा प्रस्ताव आला, तेव्हा आरोपींनी मुलीला नोकरी लावून देण्याची अट घातली. तक्रारदार यांच्या वडिलांनी नोकरी लावणे शक्य नसल्याचे सांगितले, तेव्हा आरोपींनी दहा लाख रुपये दिल्यास दिव्याला नोकरी लावतो, असे सांगितले.
हेही वाचा - मृताच्या जागी बनावट व्यक्ती उभा करून भूखंडाची केली परस्पर विक्री
तक्रारदार यांच्या वडिलांनी त्यास होकार दिला. यानंतर, दिव्या आणि रोहितचा विवाह पार पडला. काही दिवसांनंतर तक्रारदार यांच्या वडिलांनी दोन टप्प्यांत आरोपींना दहा लाख रुपये दिले. लग्न होऊन तक्रारदार सासरी नांदायला गेली. पंधरा दिवसांनतर त्यांनी पतीकडे नोकरी कधी लावणार, असे विचारले. काही दिवसांनतर पतीने त्यांना नोकरीचे बनावट नियुक्तिपत्र दिले. हे नियुक्तिपत्र तिने तपासले असता, ते बनावट असल्याचे तिला समजले. यामुळे तिने पतीला जाब विचारला असता, त्याने तिला शिवीगाळ करून मारहाण केली, शिवाय सासू, सासरे आणि अन्य आरोपींनी हा विषय कुणालाही बोलू नको, म्हणून तिला दम दिला.
मात्र, विवाहितेने वडिलांना त्यांचे पैसे परत करा, असे आग्रह धरताच, आरोपींनी तिला ५ ऑगस्ट रोजी घराबाहेर हाकलून दिले. अवघ्या तीन महिन्यांतच नवविवाहितेचे सुखी संसाराचे स्वप्न भंगल्याचे तिने पेालिसांना सांगितले. आरोपी पतीसह सासरच्या मंडळींनी खोटे बोलून, आपल्या आई-वडिलांकडून दहा लाख रुपये उकळून फसवणूक केल्याची तक्रार तिने मंगळवारी जिन्सी पोलीस ठाण्यात नोंदविली.
हेही वाचा - 'अधिकाऱ्यांच्या मनमानीपणाचे उदाहरण',औरंगाबाद खंडपीठाकडून महावितरणला ५ लाख रुपये ‘कॉस्ट’