प्रोझोनमॉलमधील अनधिकृत वाहन पार्किंगप्रकरणी एजन्सीचालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 05:08 PM2017-09-07T17:08:49+5:302017-09-07T17:12:44+5:30
विनापरवाना आणि बेकायदेशीर वाहन पार्किंग सुरू करून नागरीकांची फसवणुक करणा-या प्रोझोन मॉलच्या पार्किंग एजन्सीचालकाविरूद्ध एमआयडीसी, सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. आर्थिक गुन्हेशाखेने गुरूवारी सकाळी ही कारवाई केली.
औरंगाबाद, दि. 7: विनापरवाना आणि बेकायदेशीर वाहन पार्किंग सुरू करून नागरीकांची फसवणुक करणा-या प्रोझोन मॉलच्या पार्किंग एजन्सीचालकाविरूद्ध एमआयडीसी, सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. आर्थिक गुन्हेशाखेने गुरूवारी सकाळी ही कारवाई केली. या कारवाईने शहरातील अनधिकृत वाहनपार्किंग उभारणा-यांचे धाबे दणाणले आहे.
याविषयी, आर्थिक गुन्हेशाखेकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील काही शॉपिंग कॉम्प्लेक्स, शॉपिंग मॉल, चित्रपटगृहचालकांकडून अनधिकृत वाहन पार्किंग अनेक वर्षापासून सर्रास सुरू आहे. वाहन पार्किंगच्या नावाखाली लाखो रुपये सामान्यांकडून उकळले जातात. शॉपिंग मॉल, चित्रपटगृह आणि कोणत्याही कमर्शियल संस्थेने त्यांच्याकडे येणा-या ग्राहकांसाठी वाहने उभी करण्याची व्यवस्था करणे बंधनकारक आहे. असे असताना या लोकांकडून ग्राहकांची बिनधास्तपणे वाहन पार्किंगच्या नावाखाली वर्षानुवर्ष सर्रास फसवणुक सुरू होती. ही बाब पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना समजल्यानंतर त्यांनी आर्थिक गुन्हेशाखेचे निरीक्षक श्रीकांत नवले आणि अधिका-यांना याविषयी कारवाई करण्याचे आदेशित केले.
पो.नि. नवले आणि सहायक निरीक्षक अमोल सातोदकर यांनी प्रथम प्रोझोन मॉलमध्ये सुरू असलेल्या वाहन पार्किंगची चौकशी केली. तेव्हा मॉलने (इम्पेरिअल प्रा.लि.) वाहनपार्किंग करीता सेक्युलर पार्किंग सोल्युशन प्रा. लि. या संस्थेसोबत करार केल्याचे समजले. त्यानुसार सेक्युलर पार्किंग सोल्युशनकडून मॉलमध्ये येणा-या चारचाकी आणि दुचाकीचालकांकडून पार्किंग शुल्क म्हणून २० ते २५ रुपये प्रती वाहन वसूल करीत असल्याचे आढळले. पार्किंगचा परवाना नसताना अवैधरित्या वाहन शुल्क वसूल केले जात आहे. शिवाय ग्राहकांना देण्यात येणा-या पावत्यावर वसूल करणा-याचे नाव अथवा पत्ता नोंद केला जात नाही. तसेच पावतीवर सेवाकर किंवा जीएसटी नंबरही नसल्याचे आढळून आले. यानुसार नियमबाह्य पार्किंग सुरू करून जनतेची फसवणुक केल्याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात ७ सप्टेंबर रोजी तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून तपास सहायक निरीक्षक सतोदकर हे करीत आहेत.