‘एसटी’च्या नावाखाली फसवणुकीचा ‘उद्योग’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 05:08 AM2020-03-04T05:08:26+5:302020-03-04T05:08:32+5:30
एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभाग नियंत्रक कार्यालयात एक तरुणी निरीक्षकपदी रुजू होण्यासाठी दाखल होते.
औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभाग नियंत्रक कार्यालयात एक तरुणी निरीक्षकपदी रुजू होण्यासाठी दाखल होते. कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे नियुक्तीपत्र देते. मात्र, अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण हे नियुक्तीपत्र बनावट होते. नोकरीचे आमिष दाखवून ‘एसटी’च्या नावाखाली फसवणुकीचा उद्योग सुरू असल्याने तरुणांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन अधिकाºयांनी केले आहे.
या तरुणीकडून जवळपास ३९ हजार रुपये उकळण्यात आल्याची माहिती महामंडळाच्या अधिकाºयांनी दिली. याप्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आलेली आहे. अशा प्रकारे इतरांकडूनही पैसे उकळण्याचा प्रकार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. सुरुवातीला बँकेच्या खात्यावर काही रक्कम भरण्यास सांगितली जाते. त्यानंतर नियुक्तीपत्र देण्यासह विविध कारणे पुढे करून आणखी पैशांची मागणी केली जाते. नोकरी मिळण्याच्या आशेने तरुण पैसे देतात. पैसे उकळल्यानंतर थेट बनावट नियुक्तीपत्र हाती टेकविले जात आहे.
लोगोचा गैरवापर
एसटी महामंडळाचे विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी बा. दि. चंदनशिवे म्हणाले, एसटी महामंडळाच्या लोगाचा गैरवापर करण्यात आला. त्यामुळे पोलिसांत यासंदर्भात तक्रार देण्यात आलेली आहे. तसेच संबंधित तरुणीनेही पोलिसांत तक्रार केलेली आहे.