लायसन्ससाठी मोफत अपॉइंटमेंट
By Admin | Published: June 30, 2016 12:57 AM2016-06-30T00:57:18+5:302016-06-30T01:25:46+5:30
औरंगाबाद : आरटीओ कार्यालयातून लर्निंग आणि पर्मनंट लायसन्स मिळविण्यासाठी वाहनचालकांना प्रथम आॅनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागते.
औरंगाबाद : आरटीओ कार्यालयातून लर्निंग आणि पर्मनंट लायसन्स मिळविण्यासाठी वाहनचालकांना प्रथम आॅनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागते. ही अपॉइंटमेंट घेण्यासाठी वाहचालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. शिवाय अनेकांना अपॉइंटमेंट कशी घ्यावी, हेदेखील कळत नाही. ही सर्व अडचण लक्षात घेऊन आरटीओ कार्यालयाने मोफत अपॉइंटमेंटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे वाहनचालकांना होणारा मनस्ताप कमी होत आहे.
आरटीओ कार्यालयात लर्निंग आणि पर्मनंट लायसन्ससाठी आॅनलाईन अपॉइंटमेंटची सुविधा कार्यालयातर्फे सुरू करण्यात आली. यामुळे वाहनचालकांना आपल्या सवडीनुसार तारीख आणि वेळ निवडून लायसन्ससाठी चाचणी देता येत आहे. अनेकांना संगणकाचे ज्ञान नसल्याने अपॉइंटमेंट कशी घ्यावी, हे कळत नाही. त्यामुळे त्यांना एजंटांकडे जाण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे एजंटांनीही अशा संधीचा फायदा घेत इतर कामांबरोबर आता अपॉइंटमेंट घेऊन देण्याचेही काम सुरू केले आहे. यासाठी एक उमेदवारांकडून १०० ते १५० रुपये उकळले जात आहेत. त्यामुळे वाहनचालकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. हा प्रकार लक्षात आल्याने आरटीओ प्रशासनाने थेट कार्यालयातर्फे मोफत अपॉइंटमेंट घेऊन देण्याची सुविधा सुरू केली आहे. कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेल्या ५ क्रमांकाच्या कक्षात ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. दुपारपर्यंत ही सुविधा सुरू असते, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांनी दिली.