छत्रपती संभाजीनगरात किडनी विकाराने त्रस्त रुग्णांसाठी माेफत डायलिसिस ठरतेय वरदान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 06:34 PM2024-08-28T18:34:44+5:302024-08-28T18:35:27+5:30
ग्लोबल मेडिकल फाउंडेशनचा उपक्रम, औषधीही मोफत मिळतात
- साजीद पठाण
छत्रपती संभाजीनगर : किडनी विकाराची लागण झालेल्या रुग्णांना औषधोपचार, डायलिसिसवर मोठा खर्च करावा लागतो. गोरगरीब रुग्णांना हे उपचार परवडत नाहीत. अशा रुग्णांसाठी ग्लोबल मेडिकल फाउंडेशनने मोफत डायलिसिसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मागील पाच महिन्यांपासून ही सेवा सुरू असून, दर महिन्याला ९० ते १०० रुग्ण याचा लाभ घेत आहेत.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत सरकारी रुग्णालयात मोफत उपचार होत असले, तरी कागदपत्रांची पूर्तता व गरजेच्या वेळी अपॉइंटमेंट मिळत नसल्याने गंभीर रुग्णांना नाइलाजाने खासगीत पैसे खर्च करून डायलिसिस करावे लागते. रुग्णांची ही परवड पाहून ग्लोबल फाउंडेशनचे संचालक मसिउद्दीन सिद्दीकी यांनी गेल्या मार्च महिन्यात तीन डायलिसिस मशिन खरेदी केल्या. आतापर्यंत ५५० रुग्णांचे मोफत डायलिसिस करण्यात आले. रुग्णांना रक्त आणि औषधीही मोफत दिली जातात. मराठवाड्यातील अशा प्रकारची पहिलीच मोफत सेवा असल्याचा दावा सिद्दीकी यांनी केला.
कोठे मिळतात हे उपचार?
छत्रपती संभाजीनगर शहरातील रोजेबाग येथील पॅसिफिक रुग्णालयात आठवड्याचे सातही दिवस सकाळी १० ते ५ या वेळेत मोफत डायलिसिस केले जाते. ग्लोबल फाउंडेशनने दिलेल्या तीन मशिन व रुग्णालयाची एक अशा चार मशिनद्वारे डायलिसिस केले जाते. शहरासह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतून रुग्ण येथे येतात.
गरजूंना ॲम्ब्युलन्स, जेवण व औषधी वाटप
ग्लोबल फाउंडेशन मागील अनेक वर्षांपासून शासकीय कर्करोग रुग्णालयातील रुग्णांना दुपारचे जेवण देते. गरजूंच्या अैषधोपचाराचा खर्च व रुग्णवाहिकेची सेवाही मोफत दिली जाते. शिवाय वर्षातून सहा ते सात वेळा रक्तदान शिबिर घेऊन घाटीच्या रक्तपेढीला रक्तपिशव्या दिल्या जातात.
रविवारीही सुविधा
ग्लोबल फाउंडेशनच्या सहकार्याने मोफत डायलिसिस व औषधी दिली जातात. सध्या तीन मशिन्स आहेत. यात अजून वाढ केली जाणार आहे. रविवारीही डायलिसिस सुरू असते. रुग्णालयाकडून तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचारी नियुक्त केले आहेत.
- डॉ. इश्तियाक अन्सारी, न्युरोसर्जन