दुभंगलेले ओठ, चेहऱ्यावरील व्रणाची मोफत शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 07:13 PM2019-12-11T19:13:32+5:302019-12-11T19:17:07+5:30
डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ लायन्स क्लब आॅफ औरंगाबादतर्फे प्लास्टिक सर्जरी शिबीर
औरंगाबाद : कोणत्या बाळाचे दुभंगलेले ओठ, नाकावरील बाह्य विकृती आहे का किंवा त्याच्या डोळ्यावरील पडलेली पापणी असे काही व्यंग आहे का, तसेच चेहऱ्यावरील व्रण व डाग आहे का, जर असेल तर अशा रुग्णांवर १३ ते १७ डिसेंबरदरम्यान मोफत प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार आहे. या शस्त्रक्रिया अमेरिकेतील प्लास्टिक सर्जन डॉ. राज लाला व त्यांचे सहकारी करणार आहेत.
लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद चिकलठाणाच्या वतीने पद्मश्री डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ ४४ व्या शिबिरात गरीब रुग्णांवर मोफत प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर औषधीही मोफत देण्यात येणार आहे. यासंदर्भात आयोजित पत्रपरिषदेत प्रकल्पप्रमुख राजेश भारुका यांनी सांगितले की, रुग्णांची नोंदणी व तपासणी शुक्रवारी (दि.१३ डिसेंबर) सकाळी ८ वाजेपासून करण्यात येणार आहे. त्यात डॉक्टरांनी तपासून निवडलेल्या रुग्णांवर १४ ते १७ डिसेंबरदरम्यान एमजीएम हॉस्पिटलमध्ये प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार आहे. या शिबिरात १ हजारांहून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात येईल. ५०० रुग्णांवर प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार आहे. मागील ४२ वर्षांत १२ हजार ७०१ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात या शिबिराद्वारे यश आले आहे. प्रचार-प्रसार करण्यासाठी लायन्सतर्फे एक महाअभियान रथ तयार करण्यात आला व या रथाने जिल्ह्यात तसेच आसपासच्या जिल्ह्यात सुमारे अडीच हजार किलोमीटरचा प्रवास करून शिबिराची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविली आहे, असेही भारुका यांनी नमूद केले. मोफत औषधीचे वाटप केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे करण्यात येणार असल्याची माहिती सचिव निधी अग्रवाल यांनी दिली.
शिबिराचे उद्घाटन
अध्यक्ष दीपक अग्रवाल यांनी सांगितले की, सिडको एन-१ येथील लायन्स हॉस्पिटल येथे शुक्रवारी (दि.१३) सकाळी ८ वाजता मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे उद्घाटन डॉ. राज लाला यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय संचालक डॉ. नवल मालू, दीपस्तंभ फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. यजुर्वेंद्र महाजन, एमजीएमचे अध्यक्ष अंकुशराव कदम, प्रांतपाल नितीन बंग, एडीसीएचे अध्यक्ष रावसाहेब खेडकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.