कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यात लाचखोर कृषी अधिकाऱ्यांना अभय; ११ दिवसानंतरही निलंबन नाही
By बापू सोळुंके | Published: April 6, 2023 07:05 PM2023-04-06T19:05:45+5:302023-04-06T19:10:36+5:30
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत ठिबक सिंचनची फाईल मंजूर करण्यासाठी घेतली होती लाच
छत्रपती संभाजीनगर: शेतकऱ्यांना विविध योजना मंजूर करण्यासाठी पुरवठादाराकडून प्रती फाईल लाच घेणाऱ्या खुलताबाद तालुक्यातील कृषी विभागाच्या तीन अधिकाऱ्यांसह एका कंत्राटी कर्मचाऱ्यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले होते. या कारवाईनंतर हे अधिकारी चार दिवस जेलमध्ये राहिले होते. अशा या लाचखोर अधिकाऱ्यांना कृषी विभागाने मेहरनजर दाखविल्याचे समोर आले आहे. या अधिकाऱ्यांना घटनेच्या अकरा दिवसानंतरही सेवेतून निलंबित करण्यात आले नसल्याचे समोर आले आहे.
तालुका कृषी अधिकारी शिरीष रामकृष्ण घनबहादुर, मंडळ कृषी अधिकारी विजयकुमार नरवडे, कृषी अधिकारी बाळासाहेब संपतराव निकम आणि कंत्राटी ऑपरेटर सागर नलावडे अशी आरोपींची नावे आहेत. लहरी निसर्गाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून विविध योजना आणलेल्या आहेत. या सर्व योजना ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याने योजनेनुसार एखादी वस्तू खरेदी केली अथवा नाही, याची पडताळणी करण्याचे अधिकार कृषी विभागाच्या विविध स्तरावरील अधिकाऱ्यांना असते. ही पडताळणी झाल्यानंतरच तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचा ओके रिपार्ट गेल्यानंतरच त्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा होते.
याचाच गैरफायदा कृषी विभागाचे अधिकारी घेत असल्याच्या तक्रारी येत आहेत. पैसे न दिल्यास कृषी अधिकारी शेतकऱ्याला अनुदान मिळणार नाही, यासाठी खोडा घालतो,असा आरोप शेतकरी करीत आहेत. अशाच एका प्रकरणात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत ठिबक सिंचनची फाईल मंजूर करण्यासाठी तक्रारदार डिलरकडून प्रती फाइल ७००रुपये याप्रमाणे २४ हजार ५००रुपये आणि खुलताबाद तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी घनबहादूर यांच्यासह अन्य मंडळ कृषी अधिकारी नरवडे यांना आणि कार्यालयातील कंत्राटी ऑपरेटर नलावडे यांना २७ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडले होते. तर याच कारवाईदरम्यान स्टॉक रजिस्टरच तपासणी करण्यासाठी मंडळ अधिकारी निकम यांना हजार रुपये लाच घेताना अटक केली होती. एकाच वेळी तीन अधिकारी एक ऑपरेटर लाचेच्या जाळ्यात गेल्याने कृषी विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या जिल्ह्यातील या घटनेनंतर लाचखोर अधिकाऱ्यांवर झटपट कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र एसीबीच्या कारवाईस ११दिवस उलटले तरी ६ एप्रिलपर्यंत लाचखोर सेवेतून निलंबित करण्यात आले नसल्याचे समोर आले.
आम्ही रिपोर्ट पाठविला
एसीबीकडून आलेल्या कारवाईचा अहवाल कृषी आयुक्तालयास पाठविला आहे. हे अधिकारी किती दिवस अटक होते, याविषयी सविस्तर अहवाल वरिष्ठ कार्यालयास आवश्यक आहे. याकरीता आम्ही एसीबीशी पत्रव्यवहार करून सविस्तर अहवाल देण्याची विनंती केली आहे. या अहवालानंतर संबंधितांवर शासनाकडून कारवाई होईल.
- दिनकर जाधव, विभागीय कृषी सहसंचालक