छत्रपती संभाजीनगरात बिबट्याचा मुक्तसंचार; प्रोझोन मॉलमध्ये दर्शन,तीन बिबट्या असल्याची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 12:29 PM2024-07-18T12:29:45+5:302024-07-18T12:40:43+5:30
गेल्या चार दिवसांपासून वनविभागाच्या ७० कर्मचाऱ्यांना जंग जंग पछाडूनही बिबट्या सापडत नसल्याने शहरात दहशतीचे वातावरण आहे.
छत्रपती संभाजीनगर: सोमवारी पहाटे उल्कानगरी येथे बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर शहरातील प्रोझोन मॉलच्या पार्किंगच्या बाजूच्या रिकाम्या जागेमध्ये बिबट्या मुक्तपणे संचार करत असल्याचे बुधवारी पहाटेचे सिसिटीव्ही फुटेज आज सकाळपासून व्हायरल झाले आहे. माहिती मिळताच वनविभागाचे पथक मॉलमध्ये दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून वनविभागाच्या ७० कर्मचाऱ्यांना जंग जंग पछाडूनही बिबट्या सापडत नसल्याने शहरात दहशतीचे वातावरण आहे.
उल्कानगरी येथे सोमवारी बिबट्याचे दर्शन झाले. ५६ तासांवर काळ उलटूनही वनविभाग आणि रेस्क्यू टीमला बिबट सापडला नाही. मंगळवारी जुन्नरहून रेस्क्यू टीम बोलाविली आहे. काबरानगरात कुत्रा घेऊन जातानाचा बिबटचा फोटो पाहून दोन नंबर गल्लीत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. उल्कानगरीतील घंटागाड्या ज्या ठिकाणी थांबतात, तेथे झाडीजवळ ऑक्सिजन झोनमध्ये मनपाच्या जेसीबीने रस्ता मोकळा करून एक पिंजरा लावला आहे. दुसरा पिंजरा शंभुनगरात पोद्दार शाळेमागे लावला आहे. नाला आणि परिसरातील अडगळीच्या ठिकाणी सिग्मा हॉस्पिटलजवळील गोशाळा इ. ठिकाणी हुडकून रेस्क्यू पथकाला बिबट दिसला नाही.
वनविभाग, मनपाचे नागरी मित्र पथक, जुन्नरहून आलेली रेस्क्यू टीम यांच्याशी चर्चा करून दोन पिंजरे ठेवून त्यात दोन बोकड ठेवण्यात आले आहेत. सोमवारी पहाटेनंतर बिबट पुन्हा उल्कानगरीत दिसला नाही. नाल्यावरील बिल्डिंग आणि त्याखाली मोकळ्या जागेत मोकाट कुत्रे आणि वराहांची तो शिकार करत आहे. वनविभागाचे ७० पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचारी बिबटचा शोध घेत आहेत.
छत्रपती संभाजीनगरात आज पहाटे प्रोझोन मॉलमध्ये बिबट्याचे दर्शन, शहरात ३ बिबटे असल्याची चर्चा, चार दिवसांपासून सुरू आहे शोध #leopard#chhatrapatisambhajinagarpic.twitter.com/RdygROPdha
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) July 18, 2024
आज पहाटे प्रोझोन मॉलमध्ये दर्शन
प्रोझोन मॉलच्या मागे पार्किंगच्या बाजूला असलेल्या भागात बुधवारी पहाटे ४ वाजून २२ मिनिटांना बिबट्या मुक्त फिरत असल्याचे सिसिटीव्हीमध्ये आज सकाळी दिसून आले. तसेच मॉलच्या दुसऱ्या भागातील सिसिटीव्हीमध्ये देखील बिबट्या जाताना दिसत आहे. माहिती मिळताच वन विभागाचे एक पथक मॉलमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे. सोमवारपासून शहरात बिबट्याचे दर्शन विविध भागात होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
शहरात एक नव्हे, तर तीन बिबट्यांचा संचार !
उल्कानगरीत सोमवारी पहाटे सीसीटीव्हीत एक बिबट्या कैद झाला अन् वन विभागाची यंत्रणा कामाला लागली; पण तो अद्यापही पिंजऱ्यात अडकलेला नाही. फार्म हाऊसवरून परत येणारे डॉ. कपाठिया यांना फतियाबाद येथे बुधवारी रस्ता पार करताना बिबट्या दिसल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. चितेगावच्या पूर्वेला पांगरा येथेही बुधवारी त्याचे दर्शन झाल्याची दिवसभर चर्चा आहे. याचा अर्थ शहर व परिसरात एक नव्हे, तर तीन बिबट्याचा संचार सुरू आहे. त्यामुळे नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. सातारा-देवळाई परिसरात शाळांना सुटी देण्याचीही अनेक पालकांत चर्चा आहे.
ते आमचं काम नव्हे, वन विभागाला सांगा...
बिबट्या दिसल्याने त्यांंनी पटकन पोलिसांच्या ११२ ला फोन लावला अन् बिबट्या दिसल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्यांना, ‘अहो ते आमचे काम नाही. बिबट्या दिसला तर वन विभागाला फोन लावून सांगा,’ असे म्हणून फोन ठेवून दिला. दक्ष नागरिकांनी कळविले तर त्यांना असा अनुभव आल्यास नागरिक कसे सुरक्षित राहतील, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.
मनपाकडे मागितली गन व जाळे
मनपाकडे उपलब्ध असलेली डॉट गन (भूल देण्यासाठी) उद्यानातून वेळप्रसंगी उपलब्ध व्हावी, अशी मागणी वनविभागाने मनपाकडे केली. त्यांनीही सर्व सहकार्य देण्याची तयारी दर्शविली. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. बिबट्यांचा प्रवास हा अन्नासाठीच असून तो एका ठिकाणी थांबत नाही. आपण फक्त खबरदार व दक्षपणे असावे. जेणेकरून शहरात त्याला पकडणे शक्य होईल.
- दादा तौर, वनक्षेत्र अधिकारी
नागरिकांनी दक्ष राहावे
रेस्क्यू टीमने सांगितले की, बिबट्याचे शेवटचे फुटेज सोमवारी पहाटे ३:४७चे असून, काबरानगरात ३:३० वाजता तो कुत्र्याला तोंडात उचलून नेताना दिसतो. वनविभागाची शोधमोहीम सुरूच आहे. काही माहिती मिळाल्यास दक्ष नागरिकांनीही कळवावे.
- सूर्यकांत मंकावार, उपवनसंरक्षक