प्राध्यापकांची छळातून सोडवणूक करा; बामुक्टोचे उच्च शिक्षण सहसंचालकांना निवेदन
By राम शिनगारे | Published: March 6, 2024 07:57 PM2024-03-06T19:57:02+5:302024-03-06T19:57:25+5:30
सर्वोच्च न्यायलय, उच्च न्यायालयाचे निकाल आणि १८ जुलै २०१८ च्या युजीसीच्या नियमानुसार त्याची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ (एम.फ़ुक्टो) तर्फे राज्यभरात बुधवारी आंदोलन करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर : सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या धोरणानुसाार समस्यांची सोडवूणक तात्काळ करीत प्राध्यापकांची छळातून मुक्तता करावी, अशी मागणी करणारे निवेदन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनातर्फे (बामुक्टो) उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. सुरेंद्र ठाकुर यांना बुधवारी दिले.
सर्वोच्च न्यायलय, उच्च न्यायालयाचे निकाल आणि १८ जुलै २०१८ च्या युजीसीच्या नियमानुसार त्याची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ (एम.फ़ुक्टो) तर्फे राज्यभरात बुधवारी आंदोलन करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर बामुक्टोतर्फे सहसंचालकांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात सेवांतर्गत प्रगती योजनामधील पदोन्नतीचे लाभ मुलाखत दिनांकाऐवजी पात्रता दिनांकापासून देणे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एम. फिल. धारक प्राध्यापकांना पदोन्नतीचे लाभ तात्काळ देऊन त्यांचा छळ थांबवावा, १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेतील सर्वांनाच जुनी पेन्शन योजना लागू करावी, गुणवात्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी व नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पूर्णवेळ प्राध्यापकांची रिक्त पदे तात्काळ भरावीत, नेट-सेट मुक्त शिक्षकांना नेमणुकीच्या तारखेपासून सेवा ग्राह्य धरून जुनी पेन्शन योजना लाभ देण्यात यावेत, यूजीसीप्रमाणे सर्व प्रकारच्या रजा लागू कराव्यात, सहसंचालक कार्यालयातील पदोन्नती प्रक्रियेतील तुंबलेली प्रकरणे, २७ जुन २०१३ च्या अनुषंगाने प्राध्यापकांची तातडीने निकालात काढावी, विनाकारण त्रुटी काढणे, प्राध्यापकांचे आर्थिक शोषण थांबविण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. बाप्पासाहेब म्हस्के, सचिव डॉ. मारोती तेगमपुरे, अधिसभा सदस्य डॉ. विक्रम खिलारे, डॉ.उमाकांत राठोड, डॉ.दिलीप बिरुटे, डॉ .शफी शेख, डॉ.ज्ञानेश्वर वैद्य, डॉ. ज्ञानेश्वर देशमुख, डॉ.पुरुषोत्तम जुन्ने, डॉ.रामहरी काकडे. डॉ.उषा माने, डॉ. धनंजय खोसे, डॉ. प्रभाकर कुटे आदींची उपस्थिती होती.