शेतकऱ्यांना मोफत बियाणे द्यावेत
By Admin | Published: May 8, 2016 11:28 PM2016-05-08T23:28:10+5:302016-05-08T23:47:06+5:30
औसा : दुष्काळ निवारणासाठी शासनाचे प्रयत्न अपुरे पडत आहेत़ त्यामुळे शेतकरी होरपळत आहे़ गेल्या मोसमात पेरण्या झाल्या नाहीत़
औसा : दुष्काळ निवारणासाठी शासनाचे प्रयत्न अपुरे पडत आहेत़ त्यामुळे शेतकरी होरपळत आहे़ गेल्या मोसमात पेरण्या झाल्या नाहीत़ त्यामुळे आता शेतकऱ्यांकडे पेरण्या करण्यासाठी पैसा नाही, अशा परिस्थितीत शासनाने मोफत बी-बियाणे व खताचा पुरवठा करणे आवश्यक आहे, असे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी येथे रविवारी व्यक्त केले़
औसा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने नगर परिषदेच्या मैदानावर रविवारी दुष्काळ परिषद झाली़ यावेळी ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते़ मंचावर माजीमंत्री आ़मधुकरराव चव्हाण, आ़बसवराज पाटील, आ़अमर राजुरकर, माजी आ़शिवाजीराव पाटील कव्हेकर, जि़प़अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, प्रदीप राठी, जिल्हा काँग्रसचे अध्यक्ष व्यंकट बेद्रे, अशोकराव पाटील निलंगेकर, अप्पासाहेब पाटील, रामकिसन ओझा, अॅड़अस्मिता काटे, ज्योती पवार, सुलोचना बिदादा, अॅड़मुजीबोद्दीन पटेल, स्वयंप्रभा पाटील, निता सुर्यवंशी, अमर खानापूरे, पांडुरंग चेवले, कोमल सुर्यवंशी, नारायण लोखंडे, शरण पाटील, बिरबल देवकते, बसवराज धाराशिवे, प्रा़सचिन आलुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती़
यावेळी अशोक चव्हाण म्हणाले, खरीप हंगामासाठी मोफत खत, बी-बियाणे सरकारने दिली पाहीजेत़ त्याच बरोबरच विद्यार्थ्यांची शुल्क, महामंडळाचे कर्ज माफ करून दावणीला चारा उपलब्ध करून दिला पाहीजे़ शेती मालाला हमीभाव देऊन कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार व बागायतदारांना ५० हजार रुपये अनुदान देण्यात यावे़ शेतकरी, शेतमजुरांना कायमस्वरुपी पेन्शन योजना लागू करावी़ पशुधनाचा विमा उतरविण्यात यावा असेही ते म्हणाले़
मराठवाड्यात मोठा दुष्काळ पडला आहे़ परंतू, देशाचे पंतप्रधान दुष्काळ पाहण्यासाठी आले नाहीत, पण त्यांना मराठवाड्यातील दुष्काळ दाखविण्याची गरज आहे़ आम्ही सत्तेत असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची भाषा करणारे आता सत्तेत आहेत़ त्यांना सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसत नाहीत़ यावेळी आत्महत्या केलेल्या १८ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० हजारांची मदत दिली. प्रास्ताविक आ़बसवराज पाटील यांनी केले़ यावेळी माजीमंत्री आ़मधुकर चव्हाण, जिल्हाध्यक्ष अॅड़व्यंकट बेद्रे, माजी आ़शिवाजीराव पाटील कव्हेकर, अशोकराव पाटील यांची भाषणे झाली़ (वार्ताहर)
विलासराव देशमुख यांनी काहीच केले नाही, असे विरोधकांकडून शब्द वापरले जात आहेत़ मात्र विलासरावांनी मराठवाडा आणि महाराष्ट्राचा चौफेर विकास केला आहे़, हे विरोधकांना दिसत नाही़ स्वत:चे अपयश झाकण्यासाठी सत्ताधारी टीका करीत आहेत़ काँग्रेसची सत्ता असताना जिल्ह्या-जिल्ह्यात विकासकामे झाली़ परंतु, या दुष्काळावर राज्य शासन गंभीर नाही़ त्यांना सरकार चालविता येत नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काही पडेल, याची शक्यता नसल्याचे खा़चव्हाण यावेळी म्हणाले़