मोफत टँकर : पाणी मनपाचे, नाव नेत्यांचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 01:25 PM2019-05-02T13:25:39+5:302019-05-02T13:27:03+5:30
सावेंचे टँकर अंजली कॉम्प्लेक्समध्येच ओततात पाणी
औरंगाबाद : सिडको एन-५ येथील जलकुंभावरून आ. अतुल सावे यांचे टँकर दररोज ६ हजार लिटर पाणी मोफत नेत आहे. मनपाने या पाण्याला शुल्क आकारले तर दरवर्षी १ लाख रुपये सावे यांना भरावे लागतील. सावे यांचा टँकरचालक गरजूंना पाणी देत नाही. भाजपशी संबंधित मोठ्या नागरिकांना, अंजली कॉम्प्लेक्स आदी भागात टँकर रिकामे करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. टँकरचालकाच्या रजिस्टरमधील नागरिकांची यादी बघितली, तर ती थक्क करणारी आहे. आमदारापाठोपाठ काही सेना-भाजप युतीच्या नगरसेवकांनीही मोफत टँकरचा फंडा सुरू केला आहे.
शहरात पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज एन-५, एन-७ येथील जलकुंभांवर संतप्त नागरिक रोष व्यक्त करीत आहेत. अनेक वॉर्डांमध्ये सातव्या, आठव्या दिवशी पाणी येत आहे. पाण्यासाठी नागरिक त्रस्त झालेले असताना एन-५, कोटला कॉलनी येथील जलकुंभावरून राजरोसपणे मोफत टँकर भरणे सुरू आहे. आ. अतुल सावे यांनी २०१४ पासून दोन हजार लिटरचे टँकर सुरू केले आहे. हे टँकर बाराही महिने एन-५ येथील टाकीवरून दररोज तीन ते चार वेळेस पाणी नेत आहे. टँकरचालकाकडील रजिस्टर बघितले, तर एकाही गरजू, सर्वसामान्य नागरिकाला टँकरद्वारे पाणी देण्यात आलेले नाही. भाजपशी निगडित असलेल्या मोठमोठ्या व्यक्तींना पाणी देण्यात येत आहे. काहींना तर दररोज एक टँकर पाणी दिले जात आहे. अंजली कॉम्प्लेक्स येथे दिवसातून चार ते पाच फेऱ्या केल्याचा उल्लेख आहे.
एक हजार लिटर पाण्यासाठी मनपा ९० रुपये आकारते. सावे यांचे टँकर दोन हजार लिटरचे आहे. दिवसभरातून टँकरचालकाने चार फेऱ्या जरी केल्यास रोजचे ७२० रुपये होतात. या हिशोबाने महिना २१ हजार ६०० रुपये होतात, तर वर्षाला २ लाख ५९ हजार २०० रुपये होतात. मागील चार वर्षांपासून हे टँकर सुरू आहे. महापालिकेचे अत्यंत महागडे पाणी घेऊन मोफत सेवेचे बिंग फुटले आहे. नगरसेवक प्रमोद राठोड यांचेही टँकर मोफतच्या नावावर सुरू असल्याचे एन-५ पाण्याच्या टाकीवरील सूत्रांनी सांगितले. राजाबाजार वॉर्डाच्या नगरसेविका यशश्री बाखरिया यांनीही कोटला कॉलनीतून एक छोटा टँकर सुरू केला आहे. या टँकरची त्यांनी परवानगी घेतली असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
राजकीय नेत्यांनी टँकर आम्हाला द्यावेत
राजकीय मंडळींना मोफत टँकर सेवा सुरू करण्याची एवढी हौस असेल, तर त्यांनी चालकासह टँकर मनपाकडे सुपूर्द करावा. आम्ही त्यामध्ये डिझेल टाकून राजकीय मंडळी सांगतील त्या वॉर्डामध्ये पाणी देऊ. मनपाकडे अॅडव्हान्स पैसे भरलेल्या नागरिकांना टँकर वेळेवर मिळत नाही. मोफत टँकरचालकांना पाणी कसे काय मिळते, असा प्रश्नही संतप्त नागरिक एन-५ पाण्याच्या टाकीवर येऊन विचारीत आहेत.
कुणाचे मोफत टँकर
आ. अतुल सावे, भाजपचे नगरसेवक प्रमोद राठोङ, शिवसेना नगरसेविका यशस्वी बाखरिया या नेतेमंडळींचे टँकर दररोज किती खेपा टाकतात आणि कुणाच्या घरी हे टँकर नेले जातात, यावर महापालिकेचे कोणतेच नियंत्रण नाही.